पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आज लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात, सैन्यदलात 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' या पदाची नियुक्ती करणार असल्याचे जाहीर केले. त्यावरून देशातील विविध स्तरांमधून प्रतिक्रिया येत आहेत. देशाच्या संरक्षणाच्या इतिहासात घेतलेला हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. याबाबत ब्रिगेडियर (नि.) हेमंत महाजन यांच्याशी आमच्या वार्ताहराने संवाद साधला आहे.
महाजन यांच्या मते, या निर्णयामुळे हवाई दल, नौदल, आणि सैन्यदल आता एकत्रितरित्या काम करेल. त्यामुळे, त्यांची युद्ध करण्याची क्षमता अधिक चांगली होईल. गेल्या 50 वर्षांपासून वेगवेगळ्या सुरक्षा समित्यांनी या पदाची गरज असल्याचे वारंवार सांगितले होते. 1971 च्या लढाईनंतर फिल्ड मार्शल माणिक शॉ हे सर्वप्रथम याविषयी बोलले होते, कारगिलच्या लढाईनंतर निर्माण झालेल्या सुब्रमण्यम कमिटीने सुद्धा या पदाची गरज असल्याचे सांगितले होते. तसेच, पाच सहा वर्षांपूर्वी झालेल्या नरेशचंद्र कमिटीनेही याची गरज असल्याचे सांगितले होते. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला हा निर्णय सैन्यदलासाठी खूपच महत्त्वाचा आहे, असेही महाजन यावेळी म्हणाले.