पुणे - दत्तात्रय भरणे हेच सोलापूरचे पालकमंत्री कायम राहणार आहेत. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना बदलण्याची आवश्यकता नाही आणि तशी मागणीही झालेली नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
उजनीच्या पाणी प्रश्नासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून सोलापूर आणि इंदापूरमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यावर आज जयंत पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती. त्यावर आज निसर्ग मंगल कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आदी मान्यवर उपस्थित होते.
आजची बैठक पक्ष वाढीसाठी - दत्तात्रय भरणे
आजची बैठक ही सोलापूर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी होती. पुढे काय करायला हवं काय नाही. पक्षवाढीसाठी काय करता येईल यासाठी आजची बैठक होती. उजनीच्या पाण्याचा वाद हा मागेच संपलेला आहे. बैठकीत पालकमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं.