पुणे - कोरोना काळात सोशल डिस्टनसिंगचे महत्त्व हे प्रत्येकालाच कळले असून प्रत्येक जण बाजारात किंवा कुठेही खरेदीसाठी गेल्यानंतर सोशल डिस्टनसिंग पाळत असतो. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे शहरातील दुकानेही लवकर बंद होत असतात. त्यात एखाद्याला जर काही खरेदी करायचं असेल तर त्याला लवकरच खरेदीसाठी बाजारात जावं लागते. अश्यातच पुण्यात गोपी डेअरीच्या वतीने पहिले म्हशीच्या ताज्या दुधाचे एटीएम दीप बंगला चौक येथे उभारण्यात आले आहे. कोरोनासदृश्य परिस्थितीत सामाजिक अंतर राखणे अतिशय आवश्यक ठरते. या परिस्थितीत हे दुधाचे एटीएम उपयोगी पडणार आहे. यामध्ये चार डिग्री सेल्सिअसपर्यंत एटीएममधील तापमान असणारा आहे. या एटीएमचे वैशिष्ट्य म्हणजे ग्राहक त्यांच्या गरजेनुसार कितीही प्रमाणात दूध घेऊ शकतो. एटीएम मधील दूध हे कोणतीही प्रक्रिया न केलेले शुद्ध दूध असणार आहे.
एटीएममधून कुठल्याही वेळी दूध घेता येणार -
कोरोना सारख्या परिस्थितीत दुकाने अर्धवेळ बंद असतात. परंतु या दुधाच्या एटीएममधून कुठल्याही वेळी दूध घेता येणार आहे. हे दूध शुद्ध ताजे व प्रक्रिया न केलेले असणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील ते फायद्याचे असणार आहे. या एटीएम मध्ये दुधाचे तापमान 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत कायम ठेवण्यात येते. ज्यामुळे त्याची गुणवत्ता टिकते. ग्राहकांना बाजारात अर्धा लिटर च्या पुढे दूध घ्यावे लागते परंतु एटीएम मधून त्यांना गरजेनुसार दहा रुपयांपासून ते पुढे कितीही दूध घेता येईल. ज्या ग्राहकांनी स्वतःचे कंटेनर (किटली) आणले तर आम्ही प्लास्टिकचा वापर देखील टळणार आहे. हे पर्यावरणाच्या दृष्टीने उपयोगी ठरणार आहेत असे यावेळी गोपी डेअरीचे आनंद कुलकर्णी यांनी सांगितले.
1991 सालापासून सुरू आहे दुधाचा व्यवसाय -
आनंद कुलकर्णी यांच्या वतीने 1991 सालापासून दुधाचा व्यवसाय सुरू आहे. सुरवातीला त्यावेळी घरोघरी जाऊन दूध दिल जात होते. कालांतराने व्यवसायात बदल करत पुण्यात पहिल्यांदा दुधाचे एटीएम सुरू करण्यात आले आहे. पुढे जाऊन शहरातील विविध ठिकाणी अश्या पद्धतीचे एटीएम बसविण्यात येणार आहे. अशी माहितीही यावेळी आनंद कुलकणी यांनी दिली.
सुरुवातीला दरोरोज 40 लिटर दुधाची एटीएममधून विक्री -
गोपी डेअरीच्या वतीने पहिले म्हशीच्या ताजा दुधाचे एटीएमजे सुरू करण्यात आले त्या एटीएममधून आत्ता सुरवातीला 40 लिटर दुध विकल जात आहे. ग्राहक 10 रुपयांपासून ते 2 लिटर पर्यंत दूध घेत आहे. या एटीएममधून डेबिट कार्ड आणि फोन पे किंवा गुगल पे केल्यानंतर दूध घेता येणार आहे. गोपी डेअरीच्यावतीनेच दररोजच्या ग्राहकांना डेबिड कार्ड देण्यात आले आहे. त्याद्वारे पाहिजे त्या किमतीचे दूध घेता येणार आहे.