पुणे - पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Atrocity Against Pune Mayor Murlidhar Mohol) यांच्यावर जिल्हा न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कोथरूड येथील सार्वजनिक शौचालय आणि अतिक्रमणावर केलेल्या कारवाई दरम्यान झालेल्या वादानंतर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन एक महिन्यांत अहवाल द्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या लोकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश -
महापौर मुरलीधर मोहोळ (रा. मयूर कॉलनी, कोथरूड), ठेकेदार वसंत चव्हाण (रा. भुसारी कॉलनी, कोथरूड) आणि ठेकेदार राहुल शिवाजी शिंदे (रा. भुसारी कॉलनी, कोथरूड) आणि एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने कोथरूड पोलिसांना दिले आहेत.
सार्वजनिक शौचालय पाडल्याचा आरोप -
कोथरूडमधील भीमनगर भागातील ही घटना असून मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या पत्नी या भागातून 20 वर्षांपासून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. भीमनगरच्या नागरिकांना या ठिकाणाहून स्थलांतर करायला लाऊन त्या ठिकाणी एखादा गृहप्रकल्प सुरू करण्याचा मोहोळ यांचा प्लॅन असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारदार आणि स्थानिक नागरिक मागासवर्गीय असल्याचे माहीत असताना देखील आकस बुद्धीने कट रचून नैसर्गिक गरजा भागवण्यासाठी तयार केलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचे दरवाजे काढले. झोपडपट्टी परिसरात राहणार्या स्त्रियांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले, असे त्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यावर जिल्हा न्यायालयाने सुनावणी करताना पोलिसांना गुन्हा नोंद करुन तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
सत्र न्यायालयाची स्थगिती-
याबाबत महापौर मुरलीधर मोहळ यांनी प्रतिक्रिया दिली असून अॅट्रोसिटी हा गुन्हा आपल्या विरोधातील कट कारस्थान असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच या विरोधात सत्र न्यायालयात दाद मागितली असून या आदेशावर सत्र न्यायालयाने स्थगिती दिल्याचे मोहळ यांनी सांगितले.