पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरात खळबळ माजली आहे. चीनच्या वुहान शहरातून पसरलेला हा विषाणू भारतात देखील मोठ्या प्रमाणात पसरतोय. युरोपात इटली, स्पेन, फ्रान्स तसेच इराणमध्ये देखील विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याने आणीबाणीची स्थिती निर्माण झालीय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने कोरोनाला महामारी घोषित केली आहे. चीनमध्ये डिसेंबर अखेरीस सुरू झालेल्या या संसर्गामुळे 17 मार्चपर्यंत एकूण 81,049 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला, तर 3262 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीत एका दिवसात 475 जणांचा मृत्यू झालाय. तर एकूण मृतांचा आकडा ३ हजार पर्यंत पोहचला आहे. इटलीत कोरोना बाधितांचा आकडा 47021 वर पोहोचलाय. भारतात 267 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यातील 213 भारतीय आणि 38 परदेशी नागरिकांचा समावेश असून देशात आतापर्यंत चौघांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या 52 वर पोहोचली असून यामुळे एकाचा मृत्यू झालाय.
कोरोना म्हणजे काय ?
कोरोना हा विषाणू असून त्याचा संसर्ग मानवात आणि प्राण्यात देखील होतो. मानवा हणाऱ्या संसर्गामुळे श्वसनाचे विकार होतात. वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूला COVID - 19 हे नाव देण्यात आलं आहे. २००३ साली कोरोना विषाणुमुळे सार्सची साथ पसरली होती. मात्र या संसर्गाची तीव्रता कमी होती.
कोरोनाचा प्रसार कसा होतो ?
संसर्ग झालेल्या व्यक्तीकडून कोरोनाचा संसर्ग दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो. संसर्ग झालेली व्यक्ती शिंकल्यास, खोकल्यास बाहेर पडणाऱ्या थेंबांच्या(Droplets) संपर्कात आल्यास कोरोनाचा संसर्ग होतो. तसेच हे थेंब एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर पडल्यास आणि त्याला स्पर्श झाल्यासही रोगाचा प्रसार होतो.
कोरोनाची लक्षणं कोणती ?
सर्दी, ताप, कोरडा खोकला, थकवा येणं तसेच काही रुग्णांमध्ये घसा खवखवणे, जुलाब, अंगदुखी सारखी लक्षणं देखील आढळली आहेत. ही लक्षणे संसर्गाच्या प्राथमिक टप्प्यात आढळतात. नंतर श्वास घ्यायला त्रास होणे ते मृत्यू ओढवणं असे टप्पे आढळतात. काही व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होतो. मात्र त्यांच्यात कोरोनाची लक्षणं आढळत नाहीत. त्यांना विशेष उपचारांची देखील गरज भासत नाही.
कोरोनावर उपचार कसे केले जातात ?
अद्याप कोरोनावर कोणतीही लस अथवा ठोस उपचार नाहीत. मात्र जगभरात कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन, क्लीनिकल ट्रायल्स घेतल्या जात आहेत. जागतिक आरोग्य संघटना (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन) या संदर्भात लक्ष ठेवून आहे.
कोरोना विषाणूचा 'इन्क्युबेशन पिरेड' म्हणजे काय ?
कोरोना विषाणू शरीरात प्रवेश केल्यापासून आजाराची लक्षणं दिसण्यापर्यंतचा कालावधी म्हणजे त्या विषाणूचा इन्क्युबेशन पिरेड असतो. कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात विषाणूने प्रवेश केल्यापासून तो व्यक्तीच्या शरीरात सक्रिय होईपर्यंतच्या कालावधीला इन्क्युबेशन पिरेड म्हणून ग्राह्य धरतात. हा कालावधी 1 ते 14 दिवसापर्यंत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे संशयित व्यक्तीला 14 दिवसापर्यंत विलगीकरण कक्षात (आयसोलेशन वार्ड) मध्ये ठेवण्यात येतं.
'क्वारंटाईन' म्हणजे काय ?
कोरोना संशयित व्यक्तीला घरच्या घरी विलगीकरण करण्यात येतं. त्याला होम क्वारंटाईन म्हणतात. साधारणतः 14 दिवसांसाठी त्या व्यक्तीला विलगीकरणात ठेवण्यात येतं.
कोरोनाचा धोका नेमका कोणाला ?
करोनाचा संसर्ग नेमका कसा होतो,कोणाला धोका अधिक या प्रश्नांची, उत्तरं जगासमोर येत आहेत. मात्र आतापर्यंतच्या निरीक्षणांमधून, रक्तदाब, मधुमेह, कर्करोग असणाऱ्यांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचे समोर आले आहे. तसेच ज्येष्ठ मंडळी, लहान मुलं ज्यांची रोगप्रतिकारक्षमता कमी आहे, असे सगळे 'रिस्क ग्रुप'मध्ये येतात.
कोरोनापासून बचाव कसा करता येईल ?
कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वात महत्वाच म्हणजे हात वारंवार साबणाने अथवा सॅनिटायझरने धुणे. खोकताना अथवा शिंकताना रुमाल तोंडावर ठेवणे. किंवा हाताच्या कोपऱ्यात शिंकणे अथवा खोकणे. गर्दीची ठिकाणं टाळणे. मास्कचा वापर करणं. लोकांशी बोलताना लांबून बोलणे. किमान एक मीटर अंतर राखणे.