पुणे - दिमाखदार गणेशोत्सवासाठी पुण्याची खास ओळख आहे. पेशव्यांनी केलेल्या अष्टविनायकांच्या जिर्णोद्धानंतर पुण्यातील गणपती मंदिरांची परिस्थिती सुधारण्यात हातभार लागला. यानंतर सार्वजनिक गणेशोत्सवापासून ते घरगुती गणपतींसाठी देखील पुण्यात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. सांस्कृतिक शहराने त्याचा वारसा जपत यंदाही गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यंदाच्या उत्सवावर कोरोनाचे सावट आहे.
अशा परिस्थितीत हा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय पुण्यातील मंडळांनी घेतला आहे. पुण्यातील मानाच्या गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, मंडई गणपती तसेच भाऊ रंगारी या मंडळांना मोठी सांस्कृतिक, धार्मिक परंपरा आहे. दरवर्षी या मंडळांच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते होत असते. यावर्षी मात्र मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्तेच मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.
विशेष म्हणजे या मंडळांचे पदाधिकारी एकमेकांच्या मंडळांतील मूर्तींची प्रतिष्ठापना करणार आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते होणार आहे. यावर्षी दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना मंदिरात होणार आहे. दरवर्षीप्रमाणे भव्य देखावा तसेच मोठी आरास करण्याचे मंडळाने टाळले आहे.