पुणे - आपण अशा कालखंडात राहत आहोत ज्यामध्ये सशस्त्र लढ्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यामुळे सैन्यालाही भविष्यात तंत्रज्ञानाच्या सुविधांमध्ये पारंगत होण्याची गरज आहे, असे मत भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस.के. सैनी यांनी व्यक्त केले.
भारतीय लष्कराच्या १४६ आणि श्रीलंकेच्या 6 लष्करी अधिकाऱ्यांनी डिफेन्स सर्व्हिसेस टेक्निकल स्टाफ (डीएसटीएससी) आणि नेव्हल टेक्निकल स्टाफ (एनटीएससी) हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. त्यानिमित्त मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (मिलिट) वतीने ३७ व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी लेफ्टनंट जनरल सैनी बोलत होते.
मिलिटरी इन्स्टिट्यूटचे एअर व्हाईस मार्शल विवेक राजहंस, कमोडोर बी. वशिष्ठ, लेफ्टनंट कर्नल गुरमीत सिंग, कमोडोर पवित्तर सिंग, विंग कमांडर अजय महाजन, कमोडोर शिब्बू जॉन, मेजर प्रशांत ठाकूर यावेळी उपस्थित होते.
यावेळी लेफ्टनंट जनरल सैनी यांच्या हस्ते सर्व पदवीधर अधिकाऱ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. लष्करी अधिकाऱ्यांमधील सर्वोत्तम कामगिरीसाठी मेजर सौरभ गुप्ता, अधिकाऱ्यांमध्ये ट्रू - सर्व्हिस संयुक्तता वाढवण्यासाठी मुख्यालय इंटिग्रेटेड डिफेन्स स्टॅफ (आयडीएस) द्वारा स्थापित 'पर्पल ट्रॉफी' स्क्वाड्रन लीडर अंकित पारक यांना प्रदान करण्यात आली.