मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री नवाब मलिक यांना ईडीने बुधवारी अटक ( Nawab Malik Arrest ) केली. मनी लॉड्रिंग प्रकरणात मलिक यांना अटक केली आहे. त्यानंतर सेशन कोर्टात मलिक यांना हजर केले असता 3 मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
काय आहे आरोप?
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहिमच्या मुसक्या आवळण्यासाठी ईडीने 15 फेब्रुवारीला मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर ईडीने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक केली होती. आता तपासात नवाब मलिक यांचे दाऊद इब्राहिम याच्या सोबतचा सरदार शाहवली खान आणि हसीना पारकरचा अंगरक्षक सलीम पटेल यांच्याशी व्यवहार असल्याचे समोर आले आहे. त्याप्रकरणात ईडीने नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली आहे.
काय आहे जमीन प्रकरण?
दाऊद टोळीकडून अनेकांना धमकावून वादातील मालमत्ता बळकवण्यात आल्या होत्या. त्यातील एक पीडीत असणाऱ्या मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथील तीन एकर जमीन होती. या जमीनीची सध्याची किंमत 300 कोटी रुपये असून, ही जागा मलिक आणि दाऊदची बहीण हसिना पारकर यांनी बळकावल्याचा मुख्य आरोप आहे. या जमिनीच्या विक्रीत सरदार शहावली खान याने प्रमुख भूमिका बजावली. सरदार शहावली खान हा 1993 च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आहे. त्याला जन्मठेप झाली असून तो तुरुंगात आहेत. सलीम पटेल हा हसीना पारकरचा चालक होता. याप्रकरणी ईडीने खानचा जबाबही नोंदवला आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर आता राज्यात मोठ्या प्रमाणात राजकारण देखील तापलेल पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजपाने नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तर राष्ट्रवादीने मात्र राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, असे प्रत्युत्तर दिले आहे. पण कायदा नेमका काय सांगतो. ई़डीने समन्स बजावायला हवा होता का? नवाब मलिक यांनी राजीनामा द्यायला हवा का? ई़डीने ची ही कारवाई योग्य आहे का? या साऱ्या प्रश्नांबाबत 'ईटिव्ही भारत'ने कायदे तज्ञ असीम सरोदे यांच्याशी संवाद साधला आहे.
असीम सरोदे म्हणाले की, नवाब मलिक अटकेत असले तरी, त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार आहे. तसेच, समन्स न देता एखाद्याला चौकशीला नेता येते. मात्र, अटक करता येत नाही. नवाब मलिक त्यांच्यावर झालेल्या आरोपावर यापुर्वीही चौकशीला सामोरे गेले आहेत. त्यामुळे 3 मार्चनंतर त्यांच्या कोठडीत वाढ होण्याची, शक्यता सरोदे यांनी वर्तवली आहे.
हेही वाचा - Nawab Malik Arrested : नवाब मलिक आणि अनिल देशमुख जेलमध्ये एकत्र टिफिन खाणार, मोहित कंबोज यांची टीका