पुणे - काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. सातव हे गेल्या २३ एप्रिलपासून कोरोनाने संक्रमित होते. काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.
कोरोना झाल्यानंतर उपचाराअंती सातव यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली होती. त्यांची कोरोना चाचणी देखील निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल, असेही डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र सातव यांना झालेला न्यूमोनियाचा संसर्ग कायम राहिला आणि शनिवारी त्याची प्रकृती पुन्हा एकदा खालावली. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
राजीव सातव हे २०१४ मध्ये हिंगोली मतदारसंघातून लोकसभेचे खासदार झाले होते. सध्या ते राज्य सभेचे खासदार होते. याच सोबत राजीव सातव हे अखिल भारती काँग्रेस कमिटीचे सचिव आणि गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून ते पक्षाचे काम पाहात होते.
सातव यांच्यावर हिंगोली जिल्ह्यात मुळगावी होणार अंत्यसंस्कार; पार्थिव रवाना
राजीव सातव यांचे पार्थिव रुग्णवाहिकेतून हिंगोली जिल्ह्याकडे रवाना करण्यात आले. यावेळी रुग्णालयाबाहेर सातव यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. राजीव सातव यांच्या निधनामुळे कार्यकर्त्यांना दुख अनावर झाल्याचे दृश्य यावेळी रुग्णालयाबाहेर पाहायला मिळाले. राजीव सातव यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुळगावी हिंगोली जिल्ह्यातील कंळमनुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.