पुणे - काँग्रेसचे शहराध्यक्ष तसेच माजी आमदार रमेश बागवे यांना पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्य काँग्रेसची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये रमेश बागवे यांच्या नावाचा समावेश आहे.
शहरातील कसबा पेठ व शिवाजीनगर मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात येणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. मात्र, या 2 मतदारसंघातील उमेदवार जाहीर न झाल्याने इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. कसबा पेठ मतदारसंघातून काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी दावेदारी सांगितली आहे. तर, शिवाजीनगर मतदारसंघात माजी आमदार दीप्ती चौधरी, माजी नगरसेवक दत्ता बहिरट इच्छुक आहेत.
हेही वाचा पुण्यात विद्यमान आमदार, खासदारांवर नाराज भाजप कार्यकर्त्यांची 'पोस्टरबाजी'
पक्षाने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली असून, सर्वांना विश्वासात घेऊन पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात विजय मिळविणार असल्याचा विश्वास रमेश बागवे यांनी व्यक्त केला आहे.
या जागेवर काँग्रेसकडून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी इच्छुक होते. त्यामुळे पक्षाला अंतर्गत बंडाळीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.