पुणे - हडपसर येथील रामटेकडी परिसरातील केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) केंद्रात उशीरा आलेल्या परीक्षार्थींना आत प्रवेश देण्यास नकार दिल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि प्रशासक यांच्यात वादावादी झाली. तेव्हा परीक्षार्थींनी जबरदस्तीने गेट उघडून आत प्रवेश केला. त्यामुळे, गोंधळ उडाला होता. तसेच, परीक्षा केंद्रावर विद्यार्थी आणि आयोजकात हाणामारी झाल्याचे देखील सांगितले जात आहे.
हेही वाचा - Pune Corona Update : चिंताजनक! पुण्यात आज 5 हजार 375 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद
रामटेकडी येथे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा केंद्र आहे. या ठिकाणी परीक्षेसाठी केंद्रात प्रवेशासाठी सकाळी साडेसात ते सव्वा नऊ अशी वेळ देण्यात आली होती. याबाबतच्या सूचना हॉल तिकीटावर स्पष्टपणे नोंदविण्यात आल्या होत्या. त्यानुसार सव्वानऊ वाजता तेथील कर्मचाऱ्यांनी गेट बंद केले. त्यानंतर सुमारे ४० परीक्षार्थी उशिरा आले. त्यांनी गेट उघडण्याची मागणी केली. मात्र, कर्मचाऱ्यांनी गेट उघडण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वादावादी झाली आणि काही विद्यार्थ्यांनी जबरदस्तीने गेट उघडून आत प्रवेश केला. त्यामुळे, गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. राज्यात एसटीचा संप असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी उशीर झाल्याने हा गोंधळ झाला असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा - Arun Jakhade Passed Away : ज्येष्ठ प्रकाशक अरुण जाखडे यांचे निधन