पुणे - अतिक्रमणाविरोधात (Encroachment) कारवाई करत असताना महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना (Pmc Officer) बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे शहरातील धानोरी परिसरात अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू होती, यावेळी हा प्रकार घडला आहे. या कारवाईवेळी स्थानिक नागरिक आक्रमक झाले होते. त्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण केली. यासंदर्भात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दोन अधिकारी जखमी - गेल्या काही दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू आहे. मात्र, या प्रकाराने पालिका प्रशासन हादरून गेले आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये सध्या दहशतीचे वातावरण आहे. अतिक्रमण हटवताना असे प्रकार घडत असल्याने अतिक्रमण हटवणे पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान बनले आहे.
शहरातील अतिक्रमणांवर पालिकेने बुलडोझर - महापालिकेच्या सदस्यांची मुदत संपताच शहरातील अतिक्रमणांवर पालिकेने बुलडोझर फिरवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 9 दिवसांत 1 लाख 37 हजार चौरसफूट बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे. तसेच एक हजारहून अधिक टपऱ्या हटवण्यात आल्या आहेत. मात्र, आता कारवाई करताना अतिक्रमणच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.
हल्ला स्थानिक नगरसेविकेच्या पतीने? - पुण्यातील धानोरी लक्ष्मीनगर येथे अतिक्रमण कारवाई सुरू असताना, अतिक्रमणच्या अधिकाऱ्यांवर स्थानिक नागरिकांनी जोरदार हल्ला केला आहे. या मारहाणीत अतिक्रमण निरीक्षक अनिल परदेशी, बांधकाम निरीक्षक प्रकाश कुंभार जखमी झाले आहेत. दरम्यान, हा हल्ला स्थानिक नगरसेविकेच्या पतीने केल्याचा आरोप केला जात आहे. या मारहाणीची तक्रार देण्यासाठी संबंधित अधिकारी-कर्मचारी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत.