पुणे - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाययोजना म्हणून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. घरातून बाहेर न पडण्याचे आदेश दिल्यानंतर पुण्यातील मंचर शहरात गर्दी होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा, भाजीपाला, किराणा इत्यादी वस्तु घरपोच सुविधा मंचर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दुकानदार, भाजीविक्रेते यांच्या मदतीने सुरू करण्यात आल्याची माहिती सरपंच दत्ता गांजळे यांनी दिली.
सर्वत्र संचारबंदी लागू असताना नागरिक किराणा दुकान, भाजीपाला बाजार अशा ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत होते. त्यावर मंचर ग्रामपंचायतीने शहरातून किराणा दुकानदार व भाजीपाला विक्रेते यांची बैठक घेऊन किराणा, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याबाबत चर्चा करुन तात्काळ ही सुविधा सुरु करण्यात आली आहे, त्यामुळे मंचर शहरात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडु नका जीवनावश्यक वस्तु घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली असुन ग्रामपंचायतीचा नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला असुन हा कक्ष २४ तास प्रभावीपणे काम करणार आहे. पुढील काळात ग्रामपचायत, आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून प्रत्येक घरातील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच दत्ता गांजळे यांनी केले आहे.