पुणे - हृदय घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला प्राधान्य देण्यासाठी पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा काही क्षणासाठी थांबवल्याची घटना घडली आहे. इतर वेळी एखाद्या राजकीय नेत्याच्या गाड्यांचा ताफा निघाल्यानंतर रस्ते रिकामे करण्यात येतात. तसेच रस्त्यावरील इतर गाड्या थांबवल्या जातात. परंतु, हृदय घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेमुळे चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यालाच काही क्षण थांबावे लागले.
शुक्रवारी (दि.६सप्टेंबर)ला संध्याकाळी अवयवदान झालेले एक हृदय पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणण्यात येत होते. यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. परंतु, हे हृदय नेत असलेली रुग्णवाहिका आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा एकाच रस्त्यावर आला. यावेळी पोलिसांनी रुग्णवाहिकेला पुढे जाण्यास प्राधान्य दिले.
हेही वाचा गोंदियात 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' संघटनेकडून मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबवण्याचा प्रयत्न
हे 2015 पासूनचे पुण्यातील 100 वे ग्रीन कॉरिडॉर होते. संबंधित घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुणे पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाचे ट्विटरवरून कौतुक केले आहे.