पुणे - 'चेस दी व्हायरस' संकल्पनेप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचले पाहिजे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, असे सांगतानाच 'चेस द व्हायरस' संकल्पना राज्यभर राबवणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानावर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन लोकार्पण झाले.
"शाब्बास पुणेकर".. तुम्ही दिलेल्या वेळेत भव्य असे कोविड रुग्णालय उभारले आहे, मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाच्या संकटाला न घाबरता आपण सामोरे जात आहोत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातही अधिकाधिक चाचण्या करून बाधितांवर वेळेत उपचार करा, तसेच वयोवृद्ध आणि इतर आजाराने बाधित असलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष द्या, असे आवाहन त्यांनी केले. 'चेस द व्हायरस' याप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचले पाहिजे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, हीच संकल्पना आपण राज्यभरात राबवणार आहोत, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. मास्कचा नियमित वापर करावा, वारंवार हात धुणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुण्यासोबतच पिंपरी चिंचवडमध्येही कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जम्बो रुग्णालयाची अत्यंत कमी कालावधीत उभारणी केली, ही उल्लेखनीय बाब आहे. पुण्यातील या कोविड रुग्णालयामध्ये अद्यावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढवून रुग्णांवर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. पावसाळ्याचा कालावधी असल्याने कोरोनासोबतच साथीच्या आजारांची शक्यता विचारात घेत दक्षता घेण्याची गरज आहे. कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते हा जगभरातील अनुभव आहे. त्यावरून आपण गाफील राहून चालणार नाही, असे सांगतानाच कोरोनाचे निदान करण्यासाठी आवाजावरून चाचणी मुंबईत सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ही चाचणी यशस्वी झाल्यास कोरोना निदानाच्या मोहिमेत आपण मोठा टप्पा गाठू शकू, असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.
रुग्णसंख्या वाढत असली, तरीही बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले - अजित पवार
पुणे शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. पाऊस सुरू असताना अत्यंत कमी कालावधीत या कोविड रुग्णालयाची उभारणी केली आहे. या रुग्णालयामुळे कोविड रुग्णाला वेळेत उपचार मिळणे सुलभ होणार असून पुणे, पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागातील रुग्णाला या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे. मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी या दोन्ही जम्बो रुग्णालयांची सेवा महत्त्वाची ठरणार आहे. कोरोनविरुद्धची लढाई निर्णायक टप्प्यावर आली आहे. त्यामुळे यापुढेही प्रत्येकाने नियमांचे अत्यंत काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. 'चेस द व्हायरस' मोहीम सुरू केली असून, कोरोना निदानासाठीच्या चाचण्याही वाढवण्यात आल्या आहेत. निदान व उपचार वेळेत होतील याकडे विशेष लक्ष असून लवकरच राज्य कोरोनामुक्त होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी - आरोग्यमंत्री राजेश टोपे
कोरोना प्रतिबंधासाठी महाराष्ट्राने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, महात्मा फुले जन आरोग्य योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी होत आहे. राज्यात कोरोना निदानासाठी सर्वाधिक चाचण्या पुणे जिल्ह्यात होत आहेत. त्यामुळे वेळेत निदान व वेळेत उपचार मिळत असून पुण्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. कोरोनाबाधित रुग्णावर उपचारासाठी जम्बो रुग्णालय महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.