पुणे - देशात सर्वत्र कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळाला. उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आणि मृत्यूचा आकडा लपवण्यात आला आहे. योगी सरकारने उत्तर प्रदेशात सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत बंगाल, बिहार आणि इतर राज्यांच्या निवडणुकांमध्ये लक्ष दिले आहे. उत्तर प्रदेशात कोरोनाने मृत्यू झाले नाही तर सरकारकडून हत्या करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारत स्वतः राजीनामा द्यावा, अशी मागणी आजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांनी केली आहे.
भीम आर्मी आजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद उर्फ रावण हे एक दिवसीय दौऱ्यावर पुण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'अन्यथा महाराष्ट्र बंद आंदोलन करू'
मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारला विचारण्यासाठी तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या आजाद समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांची यावेळी आझाद यांनी भेट घेतली. राज्यात आज ओबीसी आरक्षणावर एकीकडे भाजपा आंदोलन करत आहे. तर दुसऱ्या बाजूला भीम आर्मीच्या अध्यक्षांनी देखील आज आपली बाजू मांडली आहे. आरक्षण संपवण्यासाठी जे काम आज देशात भाजपा करत आहे. तेच काम जर आज शाहू महाराजांच्या नावाने सरकारमध्ये जे बसले आहे ते करत असतील, तर ते आम्ही सहन करणार नाही. ओबीसी आरक्षणाबाबत येत्या काळात महाराष्ट्र सरकारने योग्य भूमिका नाही मांडली तर आजाद समाज पार्टीतर्फे मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करू आणि मग त्यानंतर आम्ही महाराष्ट्र बंद देखील करू, असा इशारा देखील यावेळी चंद्रशेखर आझाद यांनी दिला.
'भाजपा दोन तोंडी साप'
आज जे ओबीसी आरक्षणावरून आंदोलन करत आहे. त्यांच्या कथनी आणि करणीत खूप फरक आहे. एकीकडे देशात आज भाजपा आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे भाजपा आज महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणावरून भाजपा जे आंदोलन करत आहे. ते फक्त दिखावा आहे. यांच्या कथनी आणि करणीत खूप फरक आहे, अशी टिका यावेळी आझाद यांनी केली.
हेही वाचा - शिर्डीत दुहेरी हत्याकांड; शेतकरी कुटुंबातील पती-पत्नीची निर्घृण हत्या