पुणे - 80 तासांच्या सरकारमध्ये अजित पवारांना आपले 28 आमदार वाचवता आले नाहीत. ते दुसऱ्यांचे आमदार काय फोडणार, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना लगावला आहे. काल पुण्यात एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी मी परत कोल्हापूरला जाणार आहे, असं म्हटले होते. त्यावर अजित पवार यांनी जायचं होतं तर आले कशाला, अश्या शब्दात चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली होती. त्यानंतर अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.
तुम्ही बोला, आम्हीही बोलू-
गेली 2 वर्ष अजित पवार भाजपवर आणि त्यांच्या नेत्यांविरोधात काहीच बोलत नव्हते. मात्र आता या दोन महिन्यात ते बोलू लागले आहे. त्यांच्यावर बोलण्याचं आमचा काहीच विषय नव्हता. ते बोलत नव्हते. म्हणून आम्ही बोलत नव्हतो. आम्ही नाही बोललो तर ते लोकांना खरं वाटेल म्हणून जर तुम्ही बोलले तर आम्हीही बोलू, असे पाटील म्हणाले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्या शैलीत बोलून त्यांची खिल्ली ही उडवली.
काय म्हणाले होते अजित पवार-
भाजपामधील एक नेता मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे म्हणत असताना आता दुसरे नेते मी परत जाईन, परत जाईन, असे म्हणायला लागले आहेत. असे म्हणत अजित पवार यांनी पाटील यांच्या कोल्हापूरला परत जाण्याचा वक्तव्याचा त्यांच्या खास शैलीमध्ये समाचार घेतला.
परत जाणाऱ्या माणसांना नागरिकांनी कामे कशी सांगायची-
अजित पवार पुढे म्हणाले, चंद्रकांत पाटील पुण्याचे लोकप्रतिनिधी आहेत. मात्र आता ते परत जाण्याची भाषा करत आहेत. मग परत जाणाऱ्या माणसांना मतदारसंघातील नागरिकांनी कामे कशी सांगायची, हा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकार गेल्यामुळे भाजपच्या नेत्यांचा तोल सुटला आहे. राष्ट्रवादीचे आमदार फोडताना त्यांना गारगार वाटते. आता आमच्या पक्षात आमदार येत असतील तर त्यांना वाईट वाटण्याचे कारण नाही, अशी टीकाही अजित पवार यांनी यावेळी केली.
हेही वाचा- परत कोल्हापूरला जायचं होतं तर पुण्यात आलात कशाला? अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला