पुणे - शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर यांनी आज बाबरी मशीद विध्वंसेच्यानिमित्ताने एक ट्विट केले (Milind Narvekar tweet on Babri Masjid demolition) आहे. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP State President Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मिलिंद नार्वेकरांचे मातोश्रीशी भांडण झाले की काय कळत नाही. त्यांनी असे ट्विट करणे हे महाविकास आघाडीच्या पायाला सुरुंग लावण्यासारखे आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
भाजपच्यावतीने बूथ कमिटी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सत्राचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
- नार्वेकर यांचे ट्विट -
बाबरी मशीद विध्वंसाला आज २९ वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर शिवसेना सरचिटणीस मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar twitt) यांनी केलेले एक ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अयोध्येमधील राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) निर्माण करण्यासाठी शिवसैनिकांनी केलेल्या बलिदानाला कोटी कोटी प्रणाम, असा मजकूर असणारा बाबरी मशीद पाडतानाचा जुना फोटो नार्वेकरांनी आज सकाळी ट्विट केला. या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विरोधकांनीसुद्धा या ट्विटचा समाचार घेतला आहे.
- शिवसेना डबल ढोलकी-
शिवसेना यूपीएत जाणार या विषयावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, याला डबल ढोलकी म्हणतात. ममता बॅनर्जी आल्या की त्यांच्या सुरात सूर मिसळवायच. ममता बॅनर्जी यांची पाठ वळली की काँग्रेसच्या सुरात सूर मिसळवायचा याला डबल ढोलकी म्हणतात. सामान्य माणूस देखील अशा पद्धतीने कधी डबल भूमिका घेत नाही, असे पाटील म्हणाले. तसेच भाजपचा एकही नगरसेवक नाराज नसल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.