पुणे - भाजप नेते किरीट सोमैया यांच्यावर पुण्यात हल्ला (Attack on Kirit Somaiya) झाला होता. त्यानंतर त्यांच्या व्यंगानुसार 'सामना'मध्ये (Saamana) बातमी देण्यात आली होती. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना विचारले असता ते म्हणाले की, 'सामना' आता एखाद्या गल्लीतील वर्तमानपत्र झाला आहे. एखाद्या गल्लीतील वर्तमानपत्र जसे लोकप्रियतेसाठी लोकांना आवडणारी भाषा वापरते तसे 'सामना'चे चालले आहे. 'सामना'ने त्यांचा स्थर सोडलेला असून, त्यात त्यांना कुठलेही दुःख वाटत नाही, असे पाटील यांनी सांगितले. पुण्यातील कोथरूड येथे मोफत फिरता दवाखान्याचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
- सोमैया हल्ला प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र
भाजप नेते किरीट सोमैया यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेच्या 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आतापर्यंत कोणालाही यात अटक करण्यात आली नाही. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मी वारंवार हेच सांगत आहे की सत्तेचा दूरउपयोग सुरू आहे. आमचे सरकार असताना कधीही पोलीस अधिकाऱ्यांवर असल्याप्रकारचा दबाव नसायचा. सध्या पोलीस अधिकाऱ्यांवर एवढा दबाव आहे की या 8 जणांना अटक देखील झालेली नाही. दाखल करण्यात आलेला गुन्हा हास्यास्पद आहे. या सरकारकडून आम्हाला कुठलीही अपेक्षा नाही, म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना याबाबत पत्र लिहिण्यात आले असून, त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे असे सांगितले आहे, असे पाटील म्हणाले.
- शिवसेनेमुळेच सोमैयांना लोकसभेचे तिकीट दिली नाही -
किरीट सोमैया यांचा आवाज बंद करण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. त्यांना लोकसभेचे तिकीट देऊ नये यासाठी थेट युती दावाला लावली होती. आम्ही एक सुसंस्कृत पक्षाचे असून, युतीत वाद नको म्हणून आम्ही किरीट सोमैया यांच्यावर अन्याय केला, असे देखील यावेळी पाटील म्हणाले.
- ... तर आम्ही केंद्र सरकारला विनंती करू -
शिवाजी पार्कमध्ये लतादीदींचे स्मारक उभारा ही सूचना करण्यात आली आहे. ती चांगली सूचना असून जर राज्य सरकार जर करत नसेल तर आम्ही केंद्र सरकारला विनंती करू, असे देखील यावेळी पाटील म्हणाले.
- भविष्यात याचा हिशोब चुकता होईल -
आमदार नितेश राणे प्रकरणावर देखील पाटील म्हणाले की, एखाद्याच्या खुन्नसवर शासकीय यंत्रणा ही वापरली जात आहे. भविष्यात याचे हिशोब चुकता होईल, असेही पाटील यावेळी म्हणाले.
- जागतिक स्थरावरील सेलेब्रिटीने असे करावे की नाही हे त्यांचा वयक्तिक प्रश्न -
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे काल निधन झाले. निधनानंतर मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी काहीकाळ ठेवण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. यावेळी अभिनेता शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी देखील अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. यावेळी शाहरुखने लतादीदींच्या पार्थिवासमोर दुआ मागितली आणि फुंकर मारली. यावर सोशल मीडियावर शाहरुखला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अशा पद्धतीने एका जागतिक स्थरावरील सेलेब्रिटीने असे करावे की नाही हे त्यांचे वयक्तिक प्रश्न आहे. व्हिडिओ पाहून लोक ठरवतील. लोक खूप सतर्क झाले असून याबाबत मला काहीही म्हणायचे नाही.