मुंबई - राज्यातील शाळांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेष करून राज्यातील जिल्हा परिषद, आश्रम शाळा, वसतिगृह इथे अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत. त्यासाठी इथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार का? असा प्रश्न भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( School Education Minister Varsha Gaikwad ) यांनी राज्यातील शाळांमधील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात ( CCTV Cameras to Install in Schools ) येतील असे सांगितले.
सीसीटीव्ही कॅमेरे फक्त खाजगी शाळांमध्ये का? काल पुण्यामध्ये ११ वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेतच लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना या अनुषंगाने आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला राज्यातील सर्व शाळांमध्ये असे प्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील का? असा प्रश्न आमदार संग्राम थोपटे यांनी उपस्थित केला. तसेच हे कॅमेरे फक्त खाजगी शाळांमध्येच बसवण्यात येणार आहेत का? असाही प्रश्न उपस्थित केला.
लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे गरजेचे - या प्रश्नावर उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खाजगी व्यवस्थापणाच्या शाळांमध्ये आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा सूचना ७ एप्रिल २०१६ शासन परिपत्रकानुसार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. परंतू शासकीय शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कधी बसवणार या बाबत वर्षा गायकवाड यांनी उत्तरात न सांगितल्याने सभागृहात हल्लाबोल झाला. अखेर सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन वर्षा गायकवाड यांनी येत्या वर्षभरात टप्या टप्याने राज्यातील जिल्हा परिषद शाळा, आश्रम शाळा, वसतिगृह इथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील असे सांगितले.
हेही वाचा - 3 School Children Drowned : ओढ्यातील पाण्यात बुडून 3 शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू