पुणे - डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपचारावेळी गरोदर आईसह अर्भकाचा मृत्यू झाला, असा आरोप करत सुधीर मच्छिंद्र पवळे (वय ३०, राहणार वाकळवाडी, ता. खेड जि. पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी चाकण येथील अरगडे हॉस्पिटलचे डॉ. अरगडे, घाटकर हॉस्पिटल डॉ. घाटकर, चाकण क्रिटिकेअर हॉस्पिटलचे डॉ. सुपेकर, या तिघांवर भां.द.वी.का. क्र ३०४ अ, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सपना सुधीर पवळे यांना गुरुवारी प्रसुतीसाठी डॉ. अरगडे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी औषधोपचार करताना अधिक त्रास होऊ लागल्याने महिलेला क्रिटिकेअर हॉस्पिटल आणि घाटकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करुन उपचार करण्यात आले. मात्र, प्रसुती करताना अर्भक मुलगी मृत झाली. त्यानंतर सपनाची प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिला तपासण्यापूर्वीच मयत घोषित केले.
हलगर्जीपणे उपचार, इंजेक्शन, चुकीच्या गोळ्या आणि सलाईन दिल्याने सपनाचा मृत्यू झाला. तरुण गरोदर विवाहिता आणि बाळाच्या झालेल्या मृत्यूनंतर खासगी हॉस्पीटल हलगर्जीपणा कधी सुधारणार, असा प्रश्न नागरिकांमधून विचारण्यात येत आहे.