पुणे - पुणे महापालिकेचे सन 2021 - 22 वर्षाचे 8 हजार 370 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी महापालिकेच्या मुख्य सभेत सादर केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात आला आहे. या अंदाजपत्रकात पुणेकरांवर योजनांचा पाऊस पाडण्यात आला आहे.
अंदाजपत्रकात तब्बल 83 योजना प्रस्तावित
स्थायी समितीकडून सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात तब्बल 83 योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. शहरातील तुळशीबाग, नेहरू स्टेडियम, पेशवे उद्यान, सारसबाग, तसेच अनेक रस्ते पीपीपी तत्वावर विकसित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तर आरोग्य सुविधांचा विकास करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
स्वतः हाच्या प्रभागासाठी शून्य बजेट
स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आपल्या स्वतः हाच्या प्रभागासाठी शून्य बजेट घेतले आहे. पक्षाने शहर विकासाची जबाबदारी आणि उत्पन्न वाढविण्याची जबाबदारी दिली असल्याने, मी हा निर्णय घेतल्याचं स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितलं.
कोविड काळातही सर्वाधिक कर जमा
कोरोनाच्या पाश्वभूमीवर देशातील अन्य महापालिका आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्या होत्या. मात्र पुणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच 1 एप्रिल 2020 ते 26 जानेवारी 2021 या कालावधीत सुमारे 7 लाख 59 हजार 427 मिळकतधारकांनी 1369 कोटी 7 लाख रुपयांचा मिळकतकर जमा केला आहे. तर अभय योजनेतून 1 लाख 49 हजार 784 मिळकतधारकांनी 492 कोटी रुपये इतका मिळकतकर पुणे महापालिकेकडे जमा केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात प्रभावी महसूल वाढ, आरोग्य सुविधा, गतिमान वाहतूक, पाणीपुरवठा, नदी सुधारणा, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण खासगी सहभागातून विकास, शिक्षण, क्रीडा अशा विविध गोष्टींसाठी तरतूद करण्यात आली आहे.
महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या गावांचा विकास
पुणे महापालिकेत नुकताच तेवीस गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेची हद्द सुमारे 412 चौरस किलोमीटर इतकी झाली आहे. वाढत्या शहराबरोबरच विकास कामे करण्यासाठी निधीची गरज भासणार आहे. त्यामुळेच माझ्या स्मार्ट पुण्याच्या संकल्पनेत प्रभावी महसूल वाढीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गेल्या आर्थिक वर्षात महसूल वाढीसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र कक्ष याही वर्षी कार्यरत राहणार आहे. महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या गावांच्या विकासावर विशेष भर राहिल अशी माहिती यावेळी रासने यांनी दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी 10 कोटींची विशेष तरतूद
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच यंदाच्या अर्थसंकल्पात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विचार करता 10 कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे.
अंदाजपत्रकात करण्यात आलेल्या विशेष तरतूद
अटलबिहारी वाजपेयी वैदयकीय महाविद्यालयाच्या कामासाठी 146 कोटींची तरतूद
मुंबईतील टाटा रुग्णालयाच्या धर्तीवर नानाजी देशमुख कॅन्सर रुग्णालय उभारणीसाठी 1 कोटींची तरतूद
नवीन कार्डियाक रुग्णवाहिका खरेदीसाठी 1 कोटींची तरतूद
वास्तववादी बजेट नाही - आबा बागुल
दरम्यान स्थायी समितीकडून जो आज अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे, ते वास्तववादी नाही. उत्पन्नाचे स्त्रोत काय आहेत, याबाबत त्यात स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. स्थायी समिती अध्यक्षांनी फक्त योजनांचा पाढा वाचला आहे.अशी टिका काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केली आहे.