पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये एका विधवा महिलेने ( Widow organised Kumkum Program ) जुनाट प्रथेला फाटा देत हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला. त्याला महिलांनी देखील सहकार्य करत हजेरी ( Womens Support Widow Kumkum Program ) लावली. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रीती दीपक आगळे, असे या महिलेचे नाव आहे. प्रीती यांच्या पतीचे गेल्या वर्षी कोरोनामध्ये निधन झाल होते. त्यानंतर त्यांनी विधवा म्हणून जगण्यापेक्षा लढवय्या महिला म्हणून जगण्याचा निश्चय केला.
प्रीती यांना मिळाली मोलाची साथ -
प्रीती आगळे यांच्या पतीचे गेल्या वर्षी मे महिन्यात निधन झाले. त्यांना हा धक्का अनपेक्षित होता. अवघ्या 32 व्या वर्षी त्यांच्यावर विधवा होण्याची वेळ आली. दीड वर्षीय मुलाची जबाबदारीदेखील त्यांच्यावर आली. अशा परिस्थितीतदेखील त्यांनी आपण विधवा म्हणून का जगावे, असा निर्धार करत सुहासीनीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला. सुहासनी महिलांना त्यांनी निमंत्रण दिले. बाल मैत्रिणीला बोलावले. महिलांनी प्रीती यांना मोलाची साथ देत हळदी कुंकवाचा कार्यक्रमाला हजेरी लावत सुहासिनीचा कार्यक्रम सुरळीत पार पाडला. फुगड्या, झिम्मा खेळून प्रीतीच्या दुःखात सुखाचे अनमोल क्षण आणण्याचा प्रयत्न केला.
प्रिती यांनी घालून दिला आदर्श -
त्यांच्या या धाडसी उपक्रमाला प्रीतीच्या कुटुंबीयांनी साथ दिली. 12 वर्षांपूर्वी प्रीतीच्या वडिलांचे निधन झाले होते. आईचे अतीव दुःख आणि विधवा होऊन जगण्याची धरपड प्रितीने पाहिली होती. त्यांना हळदी कुंकवाची आवड होती. पण ती विधवा असल्याने साजरा करू शकत नव्हती. त्यामुळे आपण विधवा या प्रथेला मोडीत काढायचे, असे ठरवलं होतं. परंतु, काही वर्षांनी प्रीतीवरच विधवा होऊन जगण्याची वेळ येईल, असे स्वप्नात ही वाटले नव्हते. मात्र, त्या दुखत प्रसंगाला तोंड देत त्यांनी विधवा प्रथेला हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करून एक आदर्श घालून दिला आहे.
कुटुंबियांचीही मिळाली साथ -
पतीचे निधन झाल्यानंतर माझ्यापुढे दोन पर्याय होते. मला हे आयुष्य काढायचे आहे, की जगायचे आहे. तर जगायचे आहे, हा पर्याय मी निवडला. मनात, विचारात माझे पती आहेतच. पण ते स्वतः असते तर असे सोहळे साजरे केले असते. त्यामुळे ते नसतानादेखील अशाच प्रकारे आनंदाने जगायच ठरवलं. नवमीला सुहासणीला जेवायला घालतात. त्या दिवशी मला असा प्रश्न पडला. हा सोहळा विधवांसाठी का नाही? का आपण सोहळे साजरे करू शकत नाही. त्यामुळे आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करायचा असे ठरवले. माझ्या मनात कोणी काही म्हणेल का? असा विचार ही आला. पण कुटुंबीयांनी साथ दिली आणि सुहासणीचा कार्यक्रम साजरा केला, असे प्रीती यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Hijab Ban : 'पुढील निकाल येईपर्यंत हिजाबाचा आग्रह नको', सोमवारी होणार सुनावणी, न्यायालयाचे निर्देश