पुणे - ब्राम्हण महासंघाने आज सावरकर स्मारक या ठिकाणी चायना मोबाईल फोडून चीनचा निषेध केला. चीनने कोरोनाचा प्रसार जाणूनबुजून केला असल्याचा आरोप यावेळी महासंघाने केला. त्याचाच याठिकाणी निषेध करण्यात आला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या ठिकाणी विदेशी वस्तूंची होळी केली होती, त्याच ठिकाणी एकत्र जमत ब्राम्हण महासंघाने चिनी वस्तू वापरावर बंदी घालणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. चिनी वस्तू न वापरण्याची शपथ महासंघाने घेतली.
यावेळी बोलताना ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे म्हणाले, कोरोनासारखा आजार चीनने जाणीवपूर्वक पसरला असल्याचे संपूर्ण जगात सिद्ध होत आहे. जागतिक आरोग्य संघटनाही चीनने खिशात घातली आहे. हाच चीन आजूबाजूला असणाऱ्या राष्ट्रांवर अतिक्रमण करत असतो. भारताच्या बाबतीतही चीनचे हेच धोरण आहे. चीनला भारताची गरज आहे. भारताला चीनची गरज नाही. हे दाखवून देण्यासाठी आजचे हे आंदोलन होते. आजच्या आंदोलनामुळे चिनी वस्तूवर बहिष्कार टाकण्याचे प्रमाण वाढत जाईल आणि संपूर्ण भारतातून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जाईल.