पुणे - पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत शर्जील उस्मानी या मुस्लीम वक्त्याने हिंदू समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर आता त्याचे पडसाद उमटत आहेत. उस्मानी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, यावर समाधान न झाल्यामुळे एल्गार परिषदेचे आयोजक बी. जी. कोळसे-पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे. कोळसे-पाटील यांनी 'उस्मानी बोलला ते चूक होते. मात्र, त्याच्या एका वाक्यावरून गदारोळ करण्याची गरज काय,' असे वक्तव्य केले होते.
हेही वाचा - शर्जीलचे वक्तव्य चुकीचे, मात्र त्यावर एवढ्या गदारोळाचे कारण काय? - बी जी कोळसे पाटील
'एल्गार परिषदेच्या आयोजकांवरच कारवाई करावी'
शर्जील उस्मानी याने हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर भाजप नेत्यांनी त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. यानंतर पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात शर्जील उस्मानी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, आता कोळसे-पाटील यांनीही 'उस्मानी याने हिंदू धर्माविषयी केलेले विधान चुकीचेच आहे. मात्र हिंदू धर्मावर चर्चा करायला आम्ही तयार आहोत, शर्जील उस्मानीच्या एका वाक्यावरून गदारोळ करण्याची गरज काय,' असे म्हटले आहे. तसेच, आमच्या एल्गार परिषदेचा हेतू हा मनुवाद आणि मनीवाद हा सर्व समस्यांचे मूळ आहे हे समजावून सांगण्याचा असतो. मात्र, उस्मानी याच्या वक्तव्यानंतर त्याच्याआडून आमची बदनामी केली जात आहे. मात्र आम्ही दरवर्षी एल्गार परिषद घेणार आणि अखेरच्या श्वासापर्यंत मनुवाद आणि मनीवादाला विरोध करणार,' असे एल्गार परिषदेचे आयोजक कोळसे-पाटील म्हणाले. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी एल्गार परिषदेचे आयोजक बी. जी. कोळसे-पाटील यांच्यावरच पोलिसांनी कारवाई करावी, या मागणीसाठी यासाठी स्वारगेट पोलिसांना निवेदन दिले आहे.
'परिषदेचे व्यासपीठ वापरून धार्मिक तेढ पसरवली जाण्याची शक्यता वाटत होतीच..'
आनंद दवे म्हणाले, 'एल्गार परिषदेचे व्यासपीठ वापरून धार्मिक तेढ निर्माण केली जाईल, अशी शक्यता आम्ही आधीच व्यक्त केली होती. या सर्व शक्यता विचारात घेऊनच पोलिसांनी परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही केली होती. परंतु एल्गार परिषदेत नको तेच झाले. देशाचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्या अरुंधती रॉय, देशात हिंदूंनी बॉम्बस्फोट केले, असे म्हणणारा मुश्रीफ व्यासपीठावर होता. व्यासपीठावरून गरळ ओकली जाईल, अशी भीती होती आणि झालेही तसेच.' त्यामुळे एल्गार परिषदेच्या आयोजकांवरच पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी दवे यांनी केली आहे.
हेही वाचा - हिंदू धर्मावर वादग्रस्त वक्तव्य; शर्जील उस्मानी विरोधात अखेर गुन्हा दाखल