पुणे - एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने भर रस्त्यात तरूणीला लग्नाची मागणी घातली आहे. याला तिने नकार दिला असता त्याने भर रस्त्यात गोंधळ घातला आणि तिचा मोबाईल हातातून हिसकावून घेत निघून गेला. पुण्यातील गंगाधाम चौकात सोमवारी (दि. 14 जून) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
अर्जुन नरेंद्र बरमेडा (वय 25 वर्षे, फातीमानगर, पुणे), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी 31 वर्षीय तरुणीने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी फिटनेस प्रशिक्षक आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी तिची आरोपी सोबत एका मित्राच्या माध्यमातून ओळख झाली होती. आरोपी डिसेंबर, 2020 मध्ये लग्नासाठी तिला मागणी घातली होती. पण, तक्रारदार तरुणीने त्याला प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतरही आरोपीने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तिच्या मित्र-मैत्रिणीला फोन करून 'तरुणीशी संबंध ठेऊ नका, मी तिच्याशी लग्न करणार आहे', असे खोटे सांगितले. या सर्व प्रकारानंतर तरुणीने आणि तिच्या कुटुंबियांनी आरोपीच्या घरी जाऊन त्याला समजावून सांगितले. त्यानंतर आरोपीने यापुढे त्रास देणार नाही, असे सांगितले.
दरम्यान, सोमवारी सकाळी ही तरुणी फिटनेस क्लास घेण्यासाठी जात असताना आरोपीने तिला गंगाधाम चौकात गाठले. दारूच्या नशेत त्याने तिला भर रस्त्यात शिवीगाळ केली. माझ्याशी लग्न का करत नाहीस, असे म्हणत मोठ-मोठ्याने तिला शिव्या देऊ लागला. मला तुझा मोबाईल पाहायचा आहे, असे म्हणून तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेऊन तो निघून गेला. या सर्व प्रकारानंतर पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.
हेही वाचा - पुणे दुहेरी हत्याकांड प्रकरण : बेपत्ता असलेल्या नवऱ्यानेच खून केला असण्याची शक्यता