पुणे - शहरात पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडची (पीएमपीएमएल) बससेवा सुरू करावी, या मागणीसाठी भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पुण्यात टाळेबंदी नसून संचारबंदी असताना पीएमपीएमएल बससेवा बंद करण्यात आली, त्याला भाजपचा विरोध आहे. ही सेवा सुरू करावी यासाठी खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले, पीएमपीएमएल मुख्यालयात आंदोलन करत असताना पोलिसांनी गिरीश बापट आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
पुणे शहरातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अशा परिस्थितीत होणारा संसर्ग आटोक्यात आणावा या दृष्टीने पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याअंतर्गत पुणे शहरातील सार्वजनिक बससेवा असलेली पीएमपीएमएल बस सेवा सात दिवस बंद करण्यात आली आहे. मात्र, भाजपने या निर्णयाला विरोध केला आहे. पीएमपीएमएल पुणेकरांची जीवन वाहिनी असून ही सेवा बंद करू नये. आमचा इतर निर्बंधांना पाठिंबा आहे, मात्र सर्वसामान्य जनतेला अशाप्रकारे वेठीस धरले जाऊ नये असे भाजपचे म्हणणे आहे.
यासाठी भाजप आमदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी स्वारगेट येथील पीएमपीएमएलच्या कार्यालयात आंदोलन केले. यावेळी खासदार गिरीश बापट तसेच भाजप कार्यकर्ते पीएमपीएमएल बसमध्ये जाऊन बसले आणि बस सेवा सुरू करा, अशी मागणी करत होते. भाजपकडून आंदोलन केले जात असताना पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांकडून कार्यकर्ते तसेच खासदार यांना समजावण्याचा प्रयत्न झाला. मात्र, खासदार बापट आपल्या भूमिकेवर ठाम होते, अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत बापट यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, सरकारने पीएमपीएमएल बस बंदचा निर्णय मागे घेतला नाही तर उद्यापासून भाजप कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.