पुणे- राज्यासमोर कोरोनासारख्या महामारीचा विषय असताना तसेच राज्यात मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण यांसारखे प्रश्न असताना भाजपकडून चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. सगळ्यांचे लक्ष यावेळेला फक्त कोरोनाकडे असायला हवे, असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुवारी झालेल्या त्यांच्या कार्यकारिणीच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौकशी व्हावी, असा निर्णय करण्यात आला आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे. पुण्यातील विधान भवन येथे पुणे जिल्ह्यातील कोरोनाची आढावा बैठक राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सीबीआयला चौकशीला यायचं असेल तर राज्यसरकारची पूर्वपरवानगी गरजेची-
कोणीही काहीही मागणी केली तर लगेच उद्या होईल असे नाही, पण राज्यात सीबीआयला चौकशीला यायचे असेल तर राज्यसरकारची पूर्वपरवानगी लागते. ही बाब देखील लक्षात राहिली पाहिजे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरावर आज (शुक्रवारी) ईडीने छापामारी केली. यावर मी जास्त बोलू इच्छित नाही. संबंधित यंत्रणा त्यांचा तपास करत आहेत. हे प्रकरण सबज्युडीस आहे म्हणून यावर मी बोलणं उचित होणार नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री वळसे पाटील यांनी यावेळी दिली. अनिल देशमुख यांच्यावर परबीरसिंह आणि वाझे यांनी केलेल्या आरोप प्रकरणात चौकशी सुरू करण्यात आली आहे.