पुणे - कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. स्वत: मुक्ता टिळक यांनी टि्वट करुन त्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे.
हेही वाचा - सुमठाण्यात सरपंच, ग्रामसेवकाने केली विहिरीची चोरी; गावकऱ्यांना लावला ७ लाखाला 'चुना'
आमच्या दोघींमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सेल्फ आयसोलेशनमध्ये असून घरीच होम क्वारंटाईनमध्ये आहेत. कुटुंबीयातील अन्य सदस्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची त्यांनी माहिती दिली. मुक्ता टिळक पुण्याच्या माजी महापौर आहेत. आत्ता त्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत.
यापूर्वी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार योगेश टिळेकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. राजकीय व्यक्तींचा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वावर होत असल्याने त्यांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. पुणे शहरात कोरोनाचे सध्या 22 हजार रुग्ण झाले आहेत. तर, 13 हजार 739 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. रोज कोरोनाच्या 4 हजारच्यावर चाचण्या करणात येत आहेत. त्यामुळे रोज 800 च्यावर कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. चाचण्या वाढल्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन घराबाहेर पडावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.