पुणे - पुण्यातील दुकानांची वेळ 4 ऐवजी रात्री 7 वाजेपर्यंत वाढवण्यात यावी या मागणीसाठी आज (शुक्रवारी) भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर महाआरती करून लक्ष्मी रोड येथे पदयात्रा काढण्यात आली.
कोरोना काळातील निर्बंध शिथिल करत अनलॉकबाबतची नियमावली राज्यसरकारने जारी केली आहे. नवीन नियमावलीमध्ये राज्यभरातील जवळपास पंचवीस जिल्ह्यांना दिलासा मिळल आहे. मात्र पुणे-सातारा जिल्ह्यांमध्ये आहे तेच निर्बंध लागू असणार आहे. या जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असणार आहे. येथे मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ही दर आणि दैनंदिन वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता या जिल्ह्यातील आहेत तेच निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. यावर पुण्यातील व्यापारी आक्रमक झाले होते आणि त्यांच्याकडून आंदोलन करण्यात आले होते.आत्ता व्यापाऱ्यांच्या समर्थनार्थ भाजपाच्या वतीने महाआरती आणि पदयात्रा काढून दुकानांची वेळ सकाळी 10 ते रात्री 7 पर्यंत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
'व्यापाऱ्यांनो सविनय कायदेभंग करा आम्ही तुमच्या पाठीशी आहो'
राज्य सरकारने पुण्याला एक न्याय मुंबईला एक न्याय देत पुणेकरांवर अन्याय केला आहे. पुण्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, म्हणून राज्य सरकार पुणेकरांवर अन्याय करत आहे. व्यापाऱ्यांनी सविनय कायदेभंग करून दुकाने सुरूच ठेवली पाहिजे. आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, असे यावेळी भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.