पुणे - एकत्र सरकार चालवायचं म्हणून शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांची भलामण केली जात आहे. या वयात मी इतका फिरतोय तू किमान घराबाहेर तर पड, असे शरद पवारांना वाटत असेल, असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा - नुकसान पाहणीचे नाटक होत असेल तर मदतीसाठी आंदोलन उभारणार-राजू शेट्टी
शरद पवारांना मुख्यमंत्र्यांची वारंवार भलामण करावी लागते. त्यांना प्रोटेक्ट करावे लागत आहे त्यामुळेच त्याचे वाईट वाटते, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. बाबा मी या वयात इतका फिरतोय, तू किमान बाहेर पड असे पवारांना वाटत असेल, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावरही पाटील यांनी टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी धावत प्रवास करून उपयोग नाही. त्यांनी कोरडा प्रवास करू नये. ते मुख्यमंत्री आहेत, निर्णय घेऊ शकतात. त्यांनी तातडीने मदत देण्यासंदर्भात निर्णय घ्यावा. त्यासाठी पंचनामे करण्याची गरज नाही, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या पूरग्रस्त दौर्यावर टीका केली. प्रत्येकवेळी केंद्र केंद्र करायचे नसते. आपत्तीच्यावेळी पहिली मदत राज्य सरकारने करायची असते. नंतर केंद्राकडे मदत मागायची असते. राज्य सरकारने आधी मदत घोषित करावी, केंद्राकडून जे मिळेल ते बोनस समजायचे, असेही पाटील म्हणाले.
हेही वाचा - जलयुक्तची चौकशी लावून माझं तोंड बंद करता येईल असं सरकारला वाटतयं का? फडणवीसांनी ठणकावलं
एकनाथ खडसे पक्ष सोडणार नाहीत -
एकनाथ खडसे यांच्या नाराजीबाबतही पाटील यांनी भाष्य केले. भाजपचे नुकसान होईल असे एकनाथ खडसे वागणार नाहीत. ते प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीलाही उपस्थित होते. ते नाराज असतील तर त्यांची नाराजी दुर करू, ते पुन्हा सक्रिय होतील. ते कुठेही जाणार नाहीत, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्ष सोडण्याबाबतच्या वृत्ताचे खंडन केले आहे.