पुणे - मराठा समाजाचे आरक्षण व ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे या दोन्ही समाजातील विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या दोन्ही समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी यावर्षीचा त्यांचा शिक्षणाचा भार ज्या नेत्यांच्या शिक्षण संस्था आहेत त्यांनी, आमदार-खासदारांनी उचलावा, अशी मागणी भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिर्डी मतदार संघातील मराठा आणि ओबीसी समाजातील जे विद्यार्थी शिक्षण संस्थेत प्रवेश घेतील त्यांच्या शिक्षणाचा खर्च स्वतः आमची शिक्षा संस्था करेल, अशी घोषणाही त्यांनी केली.
मी जबाबदारी घेतली, प्रत्येक जिल्ह्यातील व तालुक्यातील नेत्यांनीही घ्यावी
राधाकृष्ण विखे म्हणाले, महाराष्ट्रात अनेक मराठा व ओबीसी समाजाच्या नेत्यांच्या शिक्षण संस्था आहेत. या सर्व नेत्यांनी विद्यार्थ्यांचे दायित्व स्वीकारले पाहिजे. केंद्र सरकारवर टीका करून किंवा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून दोन्ही समाजातील नेत्यांनी आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करू नये. माझ्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांची जबाबदारी मी घेतली आहे. तसेच ती प्रत्येक जिल्ह्यातील, तालुक्यातील नेत्यांनी घ्यावी, असे आवाहनही विखे पाटील यांनी केले.
हेही वाचा - या कारणामुळे पुण्यातल्या डॉक्टर दाम्पत्याने आत्महत्या केली असावी, भावाने दिली ही माहिती