पुणे - पूरग्रस्त भागाची पाहाणी करण्यासाठी गेलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे त्या ठिकाणी सेल्फी काढून हात दाखवतात, ही पूरग्रस्तांची क्रूर चेष्टा आहे. महाजन म्हणजे निर्लज्जपणाचा कळस असल्याची खरमरीत टीका भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे.
सेल्फी काढत हात दाखवणाऱ्या गिरीश महाजन यांच्या कानावर पूरग्रस्तांचा हात पडल्यावर त्यांना त्या ठिकाणची खरी परिस्थिती लक्षात येईल, अशा कडक शब्दात त्यांनी गिरीश महाजन यांच्या कृत्याचा निषेध केला आहे.
सद्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये भीषण पूरस्थिती आहे. मात्र, सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही. तसेच मुख्यमंत्री फक्त पाहणीच करून गेले आहेत, असे त्यांनी म्हटले.
या भागांतील परिस्थितीचा विचार करून सरकारने राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी. तसेच सर्व पक्षांनी राजकीय भूमिका बाजूला ठेवून पूरग्रस्तांच्या मदतीला धावून यायला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे.