पुणे - भाऊबीज निमित्ताने पुण्यात अग्निशामक दलाच्या जवानांसोबत भोई प्रतिष्ठानतर्फे भाऊबीज साजरी करण्यात आली. शहरात कुठेही आग लागण्याची घटना घडली तर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तत्पर असलेल्या या जवानांना कोणताही सण कुटुंबासोबत साजरा करता येत नाही. नेमकी ही बाब लक्षात घेऊन मागील 26 वर्षांपासून भोई प्रतिष्ठानतर्फे अग्निशामक दलाच्या जवानांसोबत भाऊबीज साजरी केली जाते. यंदाही त्यांच्यासोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. यावेळी या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद बघायला मिळाला.
भाऊबीजेच्या सोहळ्याला भोई प्रतिष्ठानचे मिलिंद भोई, लेफ्टनंट जनरल निवृत्त राजेंद्र निभोरकर, अग्निशामक विभागाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, माजी आमदार मोहन जोशी, ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले आणि इतर पोलीस अधिकारीही हजर होते.
अग्निशामक दलाच्या जवानांसोबत भाऊबीज साजरी -
नैसर्गिक आपत्तीमध्ये आणि आगीसारख्या घटनांमध्ये आपल्या जीवाची बाजी लावून, नागरिकांच्या जीवाचे आणि मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या अग्निशामक दलाच्या जवानांसोबत भाऊबीज साजरी करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील भोई प्रतिष्ठानकडून सुरू आहे. यंदा देखील प्रतिष्ठानच्यावतीने अग्निशामक दलाच्या जवानांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली आहे.
जवानांचे आभार व्यक्त करण्यासाठी उपक्रमाचे आयोजन -
भोई प्रतिष्ठानच्यावतीने पुणे शहरातल्या गंजपेठमध्ये असलेल्या मुख्य अग्निशामक केंद्रात जाऊन जवानांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. गेल्या 26 वर्षांपासून हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे. भोई प्रतिष्ठानच्या महिलांकडून जवानांना औक्षण करण्यात आले. अग्निशामक दलाचे जवान प्रत्येक संकटामध्ये स्वात:चा जीव धोक्यात घालून आपल्या प्राणांचे रक्षण करतात. त्यामुळे एक दिवस त्यांचे आभार मानण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
मागील 26 वर्ष सुरू आहे उपक्रम-
अग्निशामक दलातील जवान हे समाजाच्या संरक्षणासाठी वेळोवेळी आपल्या जीवावर उदार होऊन काम करत असतात. सणाच्या काळात आपल्या कुटुंबापासून लांब राहून आपले कर्तव्य बजावत असतात. दिवाळीसारख्या सणाला देखील हे जवान आपल्या कुटुंबियांसोबत नसतात. त्यामुळे गेल्या 26 वर्षांपासून या जवानांसोबत भाऊबीज साजरी करण्यात येत आहे.
याचे समाधान वाटते -
२6 वर्षांपूर्वी जवानांसोबत आम्ही भाऊबीज साजरी करण्याचा निर्णय घेतला. यावर्षीचे 26 वे वर्ष आहे. समाजासाठी झटणाऱ्या घटकासाठी आम्हाला काहीतरी योगदान देता येते याचे समाधान वाटत आहे, असे मिलिंद भोई यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - रुपाली चाकणकरांनी कुटुंबियांसोबत साजरी केली 'भाऊबीज'; ETV भारतचा आढावा