पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये गाजलेल्या बॅनर ( Pune Chandrakant Patil Banner ) लावण्याचा प्रकारानंतर आता पुण्यात लागलेल्या एका बॅनरची ( Dada Parat Ya Banner ) राजकीय वर्तुळातसह सामान्य नागरिकांमध्ये ही मोठी चर्चा होताना पाहायला मिळत आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात 'दादा परत या' असा मॅसेज लिहून काही बॅनर लावले आहेत. विशेष म्हणजे कोथरूड मतदार संघ हा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मतदारसंघ आहे. आता या बॅनरमुळे एका वेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
'दादा परत या!' - पुण्यातील कोथरूड मतदार संघात काही ठिकाणी दादा परत या असं लिहून त्यावर चक्क भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा फोटो लावण्यात आला आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या मतदार संघातून निवडून आले होते. त्यामुळे हे बॅनर त्यांच्यासाठीच लागले असल्याचं स्पष्ट झालं आहे.
चंद्रकांत पाटील कोल्हापुरात बॅनर लागले पुण्यात - चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. अनेक दिवसांपासून चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरात ठाण मांडून बसले आहेत. महाविकास आघाडी आणि भाजपने कोल्हापूर पोट निवडणूक ही प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटलांनी त्या निवडणुकीत पूर्ण लक्ष घातले आहे. मात्र, चंद्रकांत पाटील कोल्हापूरला असताना त्यांच्या पुण्यातील मतदारसंघात 'दादा परत या' असे बॅनर लागल्याने राजकीय चर्चांना उधाण आल आहे.
हेही वाचा - MNS Rally In Thane : अखेर राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांची परवानगी, ठाण्यात 9 एप्रिलला होणार सभा