पुणे- आगामी काळातही येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हाच आमचा महाविकास आघाडीचा उद्देश आहे. त्यादृष्टीने तिन्ही पक्ष पुढे जातील असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. शुक्रवारी सायंकाळी पुण्यात काँग्रेस नेत्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीपूर्वी ते माध्यमांशी बोलत होते.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यात तीन पक्षांचे सरकार असले तरी पक्ष वाढविणे ही आमची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने आगामी निवडणुकाबाबत बैठक घेतली आहे. औरंगाबाद नामांतर प्रश्नावर विचारले असता थोरात म्हणाले की, या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिकापूर्वी होती तीच कायम आहे. आमची भूमिका मुख्यमंत्री यांना पटवून देऊ. संभाजी महाराज आमचेही आराध्य दैवत आहेतच, असे थोरात यांनी म्हटले.
हेही वाचा-काँग्रेसच्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्री कार्यालयाकडून संभाजीनगर नावाचा वापर सुरूच
पुढे बाळासाहेब थोरात म्हणाले की, औरंगजेब हा विषय नाही. मात्र, नामांतरावर आमची भूमिका कायम राहील. मुख्यमंत्र्यांना आम्ही आमचे म्हणणे पटवून सांगू. तसेच संबंधित ट्विटबाबत एकत्र बसून विषय सोडवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगरचा करणारे ट्विट -
"राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्री कार्यालयाने औरंगाबादकरांचा उल्लेख संभाजीनगर असा केला होता. त्यावरून महाविकास आघाडीमध्ये सामील असलेल्या शिवसेना व काँग्रेस नेत्यांमधील औरंगाबाद शहराच्या नामांतराविषयीचे मतभेद समोर आले आहेत. बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच शासकीय कामकाजात संभाजीनगर हे नाव वापरण्यावर आक्षेप असल्याचे म्हटले होते.
हेही वाचा-औरंगाबाद विमानतळाला अजंठा-वेरूळ नाव द्यावे - रामदास आठवले
शहराच्या नामांतरावरून राज्यात राजकीय वाद -
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी राज्यातील सत्ताधारी शिवसेना आक्रमक झाली आहे. मात्र नाव बदलून विकास होत नाही असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नामांतराला यापूर्वीच विरोध केला आहे. ऐतिहासिक नावे न बदलता नवीन जिल्हे बनवून त्यांना नावे द्यावीत, रायगडला संभाजी नगरचे नाव द्यावे अशी मागणी समाजवादीचे आमदार अबू आझमी यांनी केली. तर आरपीआयनेही संभाजीनगर नाव करण्यास विरोध केला असून नाव बदलल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. आदित्य ठाकरे यांनी या वादावर तोडगा निघेल असे म्हटले आहे.