पुणे - पुण्यातील हडपसर येथून रिक्षाने जात असताना भाडे देण्यास पैसे नसल्याचा गैरफायदा घेऊन एका रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीला झाडीत नेऊन तिच्यावर बलात्कार ( Minor Girl rape driver in pune ) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सागर विभीषण बचुटे (वय २४, रा. अप्पर इंदिरानगर ) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. तसेच विकीकुमार फुली पासवान (वय २३, रा. कामठे वस्ती, फुरसुंगी), अशोक वीरबहादुर थाप्पा (वय २२, रा. फुरसुंगी) अशी अटक केलेल्या अन्य दोघांची नावे आहेत.
झाडीमध्ये नेऊन केला बलात्कार -
एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने हडपसर पोलिसांकडे याबाबत फिर्याद दिली आहे. मुलगी आणि तिची मैत्रीण हे ५ जानेवारी रोजी रिक्षाने बुधवार पेठेत जात होते. त्यांच्याकडे रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा सागर बचुटे याने तिला रेसकोर्स समोरील झाडीमध्ये नेऊन फिर्यादीवर बलात्कार केला.तसेच डिसेंबर महिन्यात फुरसुंगी येथे फिर्यादी रहात असताना विकी पासवान व अशोक थाप्पा यांनी त्यांच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आरोपी सागर बचुटे(24), विकीकुमार(23), अशोक वीरबहादूर (23) यांना अटक केली आहे.
तिघांवर गुन्हा दाखल -
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिची मैत्रीण आरोपी सागरच्या रिक्षातून जात असताना त्यांच्या कडे भाड्याचे पैसे नसल्याचे समजले. त्यांनी आरोपीला आमच्याकडे भाड्याचे पैसे नाहीत असे सांगितले. याचा गैरफायदा घेत आरोपी सागर सदर पीडितेला झाडीत घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. नंतर तो तिला सोडून पसार झाला. घडलेल्या घटना पूर्वी या मुलींना त्यांच्या ओळखीतील विकीकुमार आणि अशोक भेटले होते. त्यांनी देखील या मुलींची छेड काढून विनयभंग केला. घटनेनंतर मुलींनी हडपसर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तक्रार केली. पोलिसांनी त्या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली असून अधिक तपास करत आहे.