पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष पायी वारी सोहळा झाला नव्हता. पण, यंदाच्या वारी सोहळ्यानिमित्त लाखो वारकरी हे यंदाच्या आषाढी वारीत सहभागी झाले ( Ashadhi Wari 2022 ) आहेत. आषाढी वारीनिमित्त जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा इतिहास काय हे आपण जाणून घेणार ( Sant Tukaram Maharaj Palakhi Sohala History ) आहोत.
संत तुकाराम महाराज पालखी इतिहास - पालखी सोहळा जनक तपोनिधी नारायण महाराज देहूकर हे संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव. त्यांचा जन्म तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमना नंतर 3-4 महिन्यांनी मातोश्री जिजाबाई यांच्यापोटी झाला. अर्थातच नारायण महाराज यांना त्यांचे वडील तुकोबांचे प्रेम आणि सहवास लाभला नाही. विश्वंभर बाबा हे या घराण्याचे मुळपुरुष यांच्या आधीपासून तुकोबांच्या पुर्वजांमध्ये पंढरीच्या वारीची परंपरा अखंड चालू होती, हे महिपती लिखीत तुकोबांच्या चरित्रात निदर्शनास येते. याच विश्वंभर बाबांनी सर्वात प्रथम एकत्रित विठ्ठल-रखुमाई या स्वयंभू मूर्तीची स्थापना आपल्या वाड्यात केली. त्यांच्या पूर्वजांपासून चालू असलेली पंढरीची वारी तुकोबांनी दिंडी सोहळ्याच्या स्वरूपात त्यांचे चौदा टाळकरी आणि काही वारकऱ्यांच्या समवेत अखंड चालू ठेवली.
नारायण महाराजांनी सुरु केला सोहळा - तुकोबांच्या सदेह वैकुंठगमनानंतर कान्होबारायांनी आणि तुकोबांचे पुत्र महादेवबुवा - विठ्ठलबुवा यांनी हा पंढरीला जाणारा दिंडी सोहळा अखंडपणे चालू ठेवला. परंतू, वृद्धापकाळामुळे कान्होबारायांनी या वारीची धुरा तुकोबांचे धाकटे सुपुत्र नारायण महाराजांकडे दिली. तेही काही वारकऱ्यांसमवेत पंढरीची वारी करू लागले. काही वर्षांनंतर त्यांना मनोमन वाटु लागले की या वारीत आपल्या बरोबर भागवत धर्माचे कळस तुकोबा आणि भागवत धर्माचे पाया ठरलेले ज्ञानोबा माऊली असतील तर पंढरीची वारी अधिक परिपूर्ण आणि भक्तिरसपूर्ण होईल. हे श्वास आणि उच्छवास बरोबर असतील तर या जीवनाचे सार्थक होईल. या अनुषंगाने नारायण महाराजांनी इ.स.१६८५ साली पालखी सोहळा चालू केला. देहूत संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत घेऊन ते आळंदीला जात. तेथे माउलींच्या पादुका पालखीत विराजमान करीत. अशा प्रकारे एकाच पालखीत जगद्गुरू तुकोबा आणि माउली ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन हा पालखी सोहळा पंढरपूरला मार्गस्थ होत.
छत्रपती संभाजी महाराजांनी पालखीला दिलं होत संरक्षण - छत्रपती शिवाजी महाराजांच्या १६८० मध्ये झालेल्या निधनानंतर औरंगजेब आपले काही लाख मुघल सैनिक घेऊन महाराष्ट्रात पाय रोऊन बसला होता. त्याने येथे त्रास देऊन उच्छादाच्या परिसीमा पार केल्या होत्या. अशा काळात नारायण महाराजांनी पालखी सोहळा चालू करून वारकरी सांप्रदायात मोठे धाडसाचे पाऊल उचलले होते. छत्रपती संभाजी महाराज हे नेहमी देहूला दर्शनाला येत. त्यामुळे त्यांचे नारायण महाराजांशी जिव्हाळ्याचे नाते होते. छत्रपती संभाजी महाराजांनी या पालखी सोहळ्यास मुघलांचा काही उपद्रव होऊ नये म्हणून संरक्षण प्रदान केले होते. संभाजी महाराजांच्या १६८९ च्या बलिदानानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी हे संरक्षण पुढे चालू ठेवले होते.अशा प्रकारे सकल वारकरी सांप्रदायाला, सर्व जाती पातीला, लहान थोरांना आणि स्त्री- पुरुषांना हवा हवासा वाटणारा भक्तिचा परमोच्च आनंद देणारा पालखी सोहळा नारायण महाराजांनी चालू करून अखिल जगतामध्ये इतिहास घडवला. मात्र, काही कारणामुळे हैबतबाबा आरफळकर यांनी १८३२ सालापासून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरु केला.
खंड पडला तरी सोहळा सुरु - संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची ही परंपरा भयान दुष्काळात, साथीच्या रोगाच्या काळात किंवा महायुद्धाच्या काळातही खंड न पडता अविरत चालू होती. १८७६ साली मोठा दुष्काळ आणि साथीचे रोग होते, तरीही वारीत खंड पडला नाही. १८९६ साली प्लेगची मोठी साथ आली होती. १८९६ ते १९१७ या काळात भारतातील सुमारे १ कोटीच्या आसपास लोक मृत्युमुखी पडले होते. या वेळी ब्रिटीश सरकारने बंदी घातली होती. तरीही पालखी सोहळा प्रातिनिधीक स्वरूपात पार पडला होता. तसेच, दुसऱ्या महायुद्धाच्या सावटामुळे १९४५ साली आषाढी वारीवर बंदी घातली होती. तरीही वारकरी भक्तगण पंढरपुरात दाखल झाले होते. यावेळी ह.भ.प. भागवत महाराज देहूकर यांनी सर्व निर्बंध झुगारून चंद्रभागा नदीच्या पुलावरून पंढरपुरात प्रवेश केला होता आणि गोपाळपुर येथे किर्तन केले होते. पण, ७५ वर्षांनंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 2 वर्षी केवळ संतांच्या पादुका बसने पंढरपुरला मार्गस्थ केल्या होत्या. पालखीसमवेत पंढरीची पायी वारी न घडल्यामुळे वारकरी संप्रादायामध्ये नाराजीचा सुर होता.
यंदा 337 पालखी सोहळा - जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचं यंदा 337 पालखी सोहळा आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीच 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. 9 जूलैला वाखरी तळावर पालखी पोहोचणार आहे. 2 वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी न झाल्याने लाखो वारकरी हे देहूत दाखल झाले होते. यानंतर देहू येथील मंदिरात मानाच्या दिंडीने प्रशिक्षण घालत पालखीचं प्रस्थान केलं. यावेळी राज्यभरातील लाखो भाविक हे वारीत सहभागी झाले असून माऊली माऊली चा जयजयकार करत आहे.
पालखीचा प्रवास - देहूतील मुख्य मंदिरातून पालखी 20 जूनला प्रस्थान केल आहे. याच दिवशी रात्रीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात झाला. 21 जून आकुर्डी विठ्ठल मंदिर, 22 आणि 23 जूनला पुण्यातील निवडुंगा विठ्ठल मंदीरात मुक्काम झाला, 24 जूनला लोणी काळभोर येथे मुक्काम झाला, 24 जून यवत, 25 जून वरवंड, 27 जून उंडवडी गवळ्याची, 28 जून बारामती, 29 जून सणसर, 30 जूनला आंथर्णी, 1 जुलै निमगाव केतकी, 2 जुलै इंदापूर, 4 जुलै सराटी, 5 जुलै अकलूज, 6 जुलै बोरगाव, 7 जुलै पिराची कुरोली, 8 जुलै वाखरी तळ येथे मुक्काम असेल. 9 जुलैला पालखी दुपारी एकनंतर पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 10 जुलैला पंढरपूरला नगरप्रदक्षिणा केल्यानंतर 10 जुलैपर्यंत याच ठिकाणी मुक्कामी असेल. त्यानंतर परतीचा प्रवास सुरू होईल.
हेही वाचा - Ashadhi wari 2022 : देहूतील 'हा' युवक गेल्या 10 वर्षापासून संपूर्ण पालखी मार्गावर काढतोय रांगोळी