पुणे - ज्येष्ठ दाम्पत्याच्या घरात घुसून दरोडा टाकणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. ज्येष्ठांकडे केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनेच हा दरोडा टाकल्याचे समोर आले आहे. यांची मोठी टोळी असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी आधी केअर टेकर म्हणून करतात त्यानंतर तेथील रेखी करत दरोडा टाकतात, असे पोलीस चौकशीत समोर आले आहे. या टोळीने कोथरुड येथील जेष्ठांच्या घरी काल मध्यरात्री दरोडा टाकला होता. तो गुन्हा काही तासांत पोलिसांनी उघड केला आहे.
हे आहेत आरोपी-
आकाश कांबळे (वय 22, रा. निगडी), दीपक सुगावे (वय 21, रा. चिंचवड), संदीप हांडे (वय 25, रा. वाल्हेकरवाडी) व छगन जाधव (वय 48, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड गाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत कोथरुड पोलीस ठाण्यात 74 वर्षीय व्यक्तीने तक्रर दिली आहे.
छगन जाधव गुन्ह्याचा मास्टर माईंड-
छगन जाधव हा गुन्ह्याचा मास्टर माईंड आहे. त्याची पिंपरी चिंचवड भागात अजिंक्य नर्सिंग केअर टेकर प्रोव्हायडर अशी कंपनी आहे. तो वेगवेगळ्या लोकांना केअर टेकर म्हणून व्यक्ती पुरवत असल्याचे समोर आले आहे, असे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिली आहे.
तक्ररदार हे त्यांच्या पत्नीसह कोथरुड परिसरात त्यांच्या बंगल्यात राहतात. त्यांचा मुलगा परदेशात असतो. तर विवाहित मुलगी पुण्यातच राहते. दरम्यान त्यांच्या देखभालीसाठी त्यांनी नर्सिंग ब्युरोकडून दीड वर्षांपूर्वी एक मदतनीस कामास ठेवला होता. त्याने दीड ते दोन महिने काम केले आणि तो निघून गेला.
ज्येष्ठांच्या हातावर वार करत जखमी केले-
दरम्यान, काल मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास आरोपी हे गच्चीवर असलेल्या खिडकीचे गज कापून आत शिरले व त्यांनी फिर्यादी यांच्या पत्नीच्या गळ्याला धारधार शस्त्र लावले. तसेच त्यांच्या हातावर वार करत त्यांना जखमी केले. त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत या दांपत्याच्या बेडरूममधील कपाटातून 11 लाख 52 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर कोथरुड पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध सुरू केला.
दोन महिने काम केले आणि त्या घराची रेखी केली-
आरोपींना पकडण्यासाठी शहरात नाकाबंदी देखील करण्यात आली होती. त्यात आकाश कांबळे याला पडण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने इतर आरोपींची माहिती दिली. यानंतर या तिघांना पकडण्यात आले. चौकशीत यातील संदीप हांडे हा पूर्वी तक्ररदार यांच्या घरी केअर टेकर म्हणून काम करत असल्याचे समोर आले. त्यानुसार सखोल माहिती घेतली. त्यावेळी मास्टर माईंड छगन जाधव हा असल्याचे समजले. त्यानेच संदीप हांडे याला केअर टेकर म्हणून तक्ररदार यांच्याकडे नोकरीस लावले होते. त्याने दोन महिने काम केले आणि त्या घराची रेखी केली तसेच त्यांची पूर्ण माहिती काढली. त्यानंतर हा गुन्हा केल्याचे दिसून आले आहे.
आरोपीची केअर टेकर म्हणून कामाला व्यक्ती पुरवण्याची कंपनी-
छगन जाधव याने अजिंक्य नर्सिंग केअर टेकर या नावाने कामाला व्यक्ती पुरवण्याची कंपनी स्थापन केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या आरोपींनी अश्या प्रकारे केअर टेकर म्हणून नोकर पुरवून आणि त्यांच्या माहितीवरून अनेक गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. आरोपींनी चोरलेली रोकड, दागिने आणि पूर्ण ऐवज जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा- लालबाग गॅस दुर्घटना: मृतांचा आकडा ५ वर, ८ जणांची प्रकृती चिंताजनक
हेही वाचा- मुंबईत नाईट क्लब, पब, हॉटेल, रेस्टॉरंट महापालिकेच्या रडारवर