पुणे - फुटपाथवरील नारळ विक्रेत्याकडून 500 रुपयांची लाच घेताना मुकादमावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मुकादमाच्या घरावर छापा टाकल्यानंतर मोठे घबाड पोलिसांच्या हाती लागले आहे. कारवाईसाठी गेलेले संपूर्ण पथक घरातील संपत्ती पाहून अवाक झाले. सुनील रामप्रकाश शर्मा (वय-55) असे या मुकादमाचे नाव आहे.
संबंधित कारवाईत या अधिकाऱ्याच्या घरात 36 लाख रुपयांची रोकड आणि सात तोळ्यांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
शनिवारी(18जानेवारी) या मुकादमाने येरवडा भागातील एका नारळ विक्रेत्याकडे 500 रुपयांची लाच मागितली. या करवाईत एसीबीने पालिकेचा मुकादम शर्मा तसेच अन्य एका व्यक्तीला (गोपी उबाळे, वय-32) अटक केली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील शर्मा येरवडा क्षेत्रीय कार्यालयात मुकादम पदावर कार्यरत आहे. तर उबाळे हा बिगारी कामे करतो. नारळाच्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी लाच घेण्यात आल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे.
यानंतर एसीबीने शर्माच्या लोहगाव येथील घरावर छापा टाकला. कारवाईदरम्यान पोलिसांना 36 लाखांची रोकड मिळाली आहे. तसेच यासोबत सात तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे.