पुणे - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजी राजे येत्या 26 नोव्हेंबरपासून उपोषणाला बसणार आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की विलासराव देशमुख मुख्यमंत्री असल्यापासून हे चाललं आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 16 टक्के आणि मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यात आलं. पण परत आरक्षण टिकलं नाही. त्यांनंतर आयोग स्थापन करण्यात आला. छत्रपती संभाजीराजे यांना दुसरा कार्यक्रम होता. म्हणून ते गेले. त्यांना मी आवाहन करतो की उपोषण करू नका. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच महाविकास आघाडी सरकारची भूमिका असून आरक्षणाचा प्रश्न सुटायचा असेल तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करायला हवा, असे यावेळी पवार म्हणाले
शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यात सध्या भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात दिवसेंदिवस आरोप प्रत्यारोप होत आहे. यावर पवार यांना विचारले असता ते म्हणाले की या राज्याची संस्कृती अशी नव्हती. आम्ही सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख, मनोहर जोशी, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री पदाचा काळ पाहिला आहे. आत्ता प्रत्येकाने गांभीर्याने घाययला हवे. मात्र दुर्दैवाने असे घडत नाही. हे थांबायला हवं, असेही यावेळी पवार म्हणाले.