पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीका केली आहे. 'त्यांच्या बोलण्याला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. शरद पवार यांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला माहिती आहे. काही लोकं कधी-कधी वेगळं काहीतरी बोलून जातात. त्यांच्या बोलण्याला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
अजित पवारांनी कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा -
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांचे वेळेत झालेल्या बैठकीत अजित पवारांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा ७० लाखांचा टप्पा पार झाला आहे. ग्रामीण भागात धडक सर्वेक्षण मोहिमेंतर्गत २ लाख ८३ हजार ३२७ नमुना तपासणी करण्यात आली आहे. ग्रामीण कार्यक्षेत्रातील हॉटस्पॉट गावांमध्ये कोविड योग्यवर्तन जनजागृती, शोध चाचणी उपचार, कोविड केअर सेंटर, शासकीय योजना व कोविड लसीकरण या पाच कृतीदलाच्या माध्यमातून कोविडमुक्त गाव अभियानास सुरुवात करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. तसेच टास्क फोर्सच्या मार्गदर्शनानुसारच शाळा सूरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
...नंतर बुस्टर डोसचा विचार करू -
सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात बोलताना कोरोना लसीचे दोन डोस पुरेसे नसून दोन्ही डोस झाल्यानंतर बूस्टर डोसदेखील गरजेचा असल्याचे म्हटले होते. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. संपूर्ण राज्यातील नागरिकांना दोन्ही डोस देऊन झाल्यानंतर बूस्टर डोस संबधी विचार करू. तत्पूर्वी ज्या नागरिकांना पैसे देऊन बूस्टर डोस घेणे शक्य असेल त्यांनी तो घ्यावा, असे अजित पवार म्हणाले.
हेही वाचा - राज्यातील कुचकामी सरकार कसे लवकर जाईल यासाठी कामाला लागा; नारायण राणेंचे भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन