पुणे - अॅमेनोरा सिटी येथे शाळा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. उद्घाटनाच्या वेळी भाषणादरम्यान 'साक्षात विद्यापीठच माझ्या शेजारी बसले आहे', असे ठाकरे म्हणाले. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, असे सांगत आदित्य ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर पुष्पसुमने उधळली. पवार यांच्यासोबत पहिल्यांदाच कार्यक्रमात सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाच्या परिस्थितीनंतर शाळांमध्ये मोठ्या बदलांची आवश्यकता असल्याचे पवार यांनी सांगितले. एका वर्गात जर तीस चाळीस विद्यार्थी पूर्वी बसत असतील, तर आता पंधरा ते वीस विद्यार्थी बसवावे लागतील, असे ते म्हणाले. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसवावा लागेल. त्यामुळे शाळा वेगवेगळ्या उपाययोजना अवलंबण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्र सरकार देखील त्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे.
ते पुण्यातल्या अॅमेनोरा सिटी येथे चात्रभुज नारासी शाळेचा भूमिपूजन कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी शाळांमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शाळा काही उपाय सुचवत आहेत. ज्यामध्ये एक दिवसाआड दोन भिन्न गटातील विद्यार्थ्यांची शाळा भरवण्याचा पर्याय विचाराधीन असल्याची माहिती त्यांनी दिली.