पुणे - अंध व्यक्ती रहदारीमध्ये स्वत:ला सांभाळत आपली कामे करू शकतो. तर डोळस व्यक्ती रहदारीत वाहतूकीचे नियम का पाळू शकत नाही, असा सवाल करत एका जादुगराने अनोख्या पद्धतीने जनजागृती केली.
राज्यभरात सध्या रस्त्यावर होणारे अपघात, वाहतूक कोंडी यावर जनजागृती करण्यासाठी वाहतुक सुरक्षा सप्ताह सुरू आहे. नागरिकांना रहदारीचे नियम पाळणे, रस्त्यावर योग्य प्रकारे वाहन चालवणे, पार्कींग योग्य पद्धतीने करणे, अशा वाहतुकीच्या विविध घटकसंदर्भात जागरूक करण्यासाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन हे राज्यभर सुरू आहेत. याच अंतर्गत सोमवारी पुण्यात एका अनोख्या पद्धतीने जनजागृती करण्यात आली.
सारसबागेपासून शनिवार वाड्या पर्यत डोळ्याला पट्टी बांधून दुचाकी चालवत वाहतूक नियमबाबत अनोख्या पद्धतीने जनजागृती करण्यात आली. पुण्यात रस्त्यावर रहदारीत डोळ्यावर पट्टी बांधून जादूचा हा भन्नाट प्रयोग एका जादूगाराने सादर केला. जादूगार प्रसाद कुलकर्णी असे या जादूगाराचे नाव असून डोळ्यावर पट्टी बांधून पुण्यातील सारसबाग ते शनिवारवाडा असा दुचाकीवर प्रवास त्यांनी केला आहे. यातील विशेष बाब म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर तीन स्तराची काळी पट्टी बांधण्यात आली होती.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्लाइंड फोल्ड या कलेचा कुलकर्णी यांनी या सादरीकरणासाठी वापर केला. त्यामुळे आज पुण्यातील रस्त्यावर या जादूगाराची मोठी चर्चा होती. अंध व्यक्तींच्या अपघाताच्या तुलनेत डोळस व्यक्तींचे अपघात तीनशेपट अधिक होतात, अंध व्यक्ती जर रहदारी मध्ये स्वतःला सांभाळत आपली कामे करू शकतात तर डोळस व्यक्ती का नियमांचे पालन करू शकत नाही, असा प्रश्न उपस्थित करत डोळस लोकांना याची जाणीव करून देण्यासाठी या डोळ्यावर पट्टी बांधून रहदारीतून गाडी चालवण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा - जास्त खोलात जाऊ देऊ नका, उपमुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा
हेही वाचा - महाराष्ट्रातील सर्वात मोठा तुरुंग येरवडा उद्यापासून पर्यटनासाठी खुला