पुणे - अखेर 'त्या' गंभीर जखमी झालेल्या प्रियकराचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. शनिवारी एकतर्फी प्रेम प्रकरणातून प्रियकराने विवाहित महिलेचा भर रस्त्यात धारदार चाकूने खून केला होता. त्यानंतर स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गंभीर जखमी झालेल्या प्रियकरावर रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, रात्री उशिरा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, चिखली पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे.
राणी सतीश लांडगे वय-29 असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून अरविंद शेषेराव गाडे वय-30 असे एकतर्फी प्रेम प्रकरणातून आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सतीश लांडगे यांनी चिखली ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला राणी सतीश लांडगे हिच्यावर आरोपी अरविंद शेषेराव गाडे याचे एकतर्फी प्रेम होते. यातूनच शनिवारी दुपारच्या सुमारास घरी परतत असताना अरविंदने महिलेचा रस्ता अडवून बोलण्याचा आग्रह केला होता. मात्र, बोलण्यास नकार दिल्याने प्रियकराने चाकू काढून महिलेच्या पोटात भोकसून खून केला. तर प्रियकराने अरविंदने स्वतःवर देखील चाकूने वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
शनिवारी रात्री उशिरा जखमी प्रियकराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे. घटनेचा अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.