पुणे - महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही.असे म्हणणं धाडसाचे ठरणार आहे. याचे कारण असे कि कोरोनाची महामारी संपूर्ण जगात पसरली आहे. आणि त्यामुळे एकामागो दुसरी आणि दुसऱ्या मागे तिसरी लाट येणार. जेव्हा नवीन लाट येत असते तेव्हा नवीन व्हेरियंट तयार व्हायचं असतो. राज्यात सध्या ए वाय 4 हा डेल्टा प्लस व्हेरियंट तयार झाला असून त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे जालना येथे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जे विधान केलं आहे ते धाडसाचं विधान आहे, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे.
डेल्टा प्लसच्या रुग्णांत होतीय वाढ -
ऑगस्ट महिन्यात राज्यात 137 रुग्ण हे नव्या व्हेरियंटचे निघाले असून आता 1 टक्का रुग्णांमध्ये डेल्टा प्लस सापडत आहे. कदाचित तो काही काळानंतर वाढू देखील शकतो.आणि महत्त्वाचं म्हणजे नागरिकांकडून निर्बध तसेच मास्क वापरणे हे कमी झाले आहे. त्यामुळे देखील डेल्टा पल्सचे विषाणू वाढू शकतात. तसेच टेस्टिंगचे प्रमाण देखील कमी झाले आहे. जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पहिले होत होती ती आत्ता होत नाहीये. त्यामुळे रुग्ण संख्या वाढू शकते. असे देखील भोंडवे यांनी यावेळी सांगितले.
तिसरी लाट येणारच -
कोरोनासारख्या महामारीच्या लाटांची पुनरावृत्ती होत असते. लाट येते तिचा उच्च बिंदू गाठल्यानंतर परत ती लाट ओसरते. आज भारताच्या तुलनेत पाश्चात्य देशांमध्ये काय घडते आहे याचा अंदाज घेतला तर तिथे तिसरी आणि चौथी लाट देखील आल्याचे निदर्शनास येते. भारतात देखील ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये ही तिसरी लाट येणार आहे, असे देखील भोंडवे यांनी यावेळी सांगितलं.