पुणे : बेरोजगारीला कंटाळून एका व्यक्तीने पत्नी आणि एक वर्षीय मुलाची हत्या केल्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी आणि धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. या प्रकरणी लोणी-काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पत्नी-मुलाची हत्या केल्यानंतर केली आत्महत्या
याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाक वस्ती येथे राहणाऱ्या हनुमंत दर्याप्पा शिंदे (वय 38) याने आत्महत्या करण्यापूर्वी पत्नी प्रज्ञा हनुमंत शिंदे (वय 28) हिचा गळा दाबून तर मुलगा शिवतेज हनुमंत शिंदे (वय 1 वर्ष 2 महिने) याचा सुरीने गळा कापून खून केला. त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान कदमवाक वस्ती येथे हा प्रकार घडला. कामधंदा नसल्याने त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.
नैराश्यातून केली आत्महत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असलेला हनुमंत शिंदे हा मागील काही वर्षांपासून कदमवाक वस्ती येथे राहत होता. मागील काही दिवसांपासून कामधंदा नसल्यामुळे तो बेरोजगार होता. यामुळे त्याला नैराश्य आले होते. याच नैराश्यातून त्याने रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास हे भयानक कृत्य केले. याप्रकरणी दर्याप्पा अर्जुन शिंदे यांनी फिर्याद दिली असून लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.