पुणे: पुण्यातील भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आले असताना, एका 17 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. शुभम प्रदीप चोपडे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. बारामतीतल्या शारदाबाई पवार विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयातले 46 विद्यार्थी आणि 4 शिक्षक रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जातं असताना ही घटना घडलीय.
बारामतीच्या शारदाबाई पवार विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयातले 46 विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि 4 शिक्षक ट्रेकिंगसाठी रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आले होते. सकाळी 9 वाजता ते भोर-रायरेश्वर मार्गावरील कोर्ले याठिकाणच्या एका हॉटेलवर नाष्टा करण्यासाठी ते थांबले होते. नाष्टा झाल्यावर सगळे गाडीत बसण्यासाठी निघाले असताना शुभमला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि त्यातच त्याला हृदय विकाराचा झटका आला.
यानंतर शुभमला लगेचचं जवळच्या अंबवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं. शुभम हा मूळचा करमाळा तालुक्यातील उंब्रट गावाचा रहिवासी आहे. शिक्षणासाठी तो बारामती येथे राहत होता. शुभमच्या जाण्याने त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या मित्रांना आणि शिक्षकांना जबर धक्क बसाला. अवघे 17 वर्ष वय असणाऱ्या शुभमचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातीय.