पुणे - गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मानाच्या पाच गणपतीसह सर्वच गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीसाठी आपापले रथ तयार केले आहेत. पुणे महापालिकेनेही घाटांवर तयारी केली आहे, तर पोलीस प्रशासनही बंदोबस्तासाठी तयार आहे. सकाळी दहा वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. विसर्जन मिरवणुकीत तब्बल सात हजारपेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिरवणूक मार्गावर बीडीडीएसची सात पथके असणार आहेत. त्याचबरोबर पाच शीघ्र कृती दल, वज्र, वरून, पाच दंगल नियंत्रण पथक आणि सहा स्ट्रायकिंग फोर्स राखीव ठेवण्यात आले आहेत.
हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार : गणेश नाईकांचा 48 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश
विसर्जन मार्गावर 169 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांमध्ये एकूण 377 बैठका घेऊन समन्वय साधण्यात आला. त्याचबरोबर गणेश मंडळांच्या 30 हजार स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मानाच्या गणपतीसमोर तीन ढोलपथक तर इतर गणपतींच्या समोर दोन ढोल पथकांना परवानगी देण्यात आली आहे. ढोल पथकातील एकूण सदस्यांची संख्या 100 पर्यंत ठेवण्याची मर्यादा घालण्यात आली. गणेशोत्सवात आतापर्यंत बारा मंडळांवर ध्वनिप्रदूषण अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा - राज ठाकरे 'ईडी'च्या चौकशीनंतर गप्प झालेत - अजित पवार
शहरातील सतरा रस्ते ठराविक अंतरावर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेत. यावेळी इतर मार्गावरून ही वाहतूक वळवण्यात आली आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रिंगरोडही तयार केला आहे.