पुणे - कोंढवा परिसरातील पाच मजली इमारत पोलीस आणि अग्निशमन दलाने जमीनदोस्त केली. इमारतीच्या मुख्य खांबाला तडा गेल्याने इमारतीला हादरे बसले होते. या घटनेनंतर इमारतीतील नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. यामुळे कोंढवा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ही संपूर्ण इमारत जमीनदोस्त केली.
ही इमारत अल्फा डेव्हलपर्सच्या मालकीची असून इम्रान शेख हे इमारतीचे मालक आहेत. मुख्य खांबाला तडा गेल्यानंतर संबंधित बिल्डरला ही अनधिकृत इमारत जमीनदोस्त करण्याची नोटीस दिली होती. इमारतीमधील रहिवाशांनाही इमारत खाली करण्यासाठी नोटीस दिली. परंतु या नोटीसला बिल्डरने कोणतेही उत्तर न दिल्याने महापालिकेने ४ एप्रिलपासून या अनधिकृत धोकादायक इमारतीवर कारवाई सुरू केली. कोंढवा पोलीस व कोंढवा अग्निशामक दलाने या इमारतीत राहणाऱ्या ८० रहिवाशांना सुखरूप बाहेर काढत इमारत पूर्णपणे रिकामी केली. त्यानंतर या इमारतीची पाहणी करुन ही धोकादायक इमारत जमीनदोस्त केली.